For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनायासेन मरणं...

06:17 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनायासेन मरणं
Advertisement

अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं

Advertisement

देहान्ते तव सान्निध्यं, देहि मे परमेश्वर:

अशी एक प्रार्थना आहे.

Advertisement

असा एक श्लोक आहे. देवळात जाणारी व्यक्ती देवाच्या समोर मागणं मागताना दोन्ही हात जोडून वरती दिलेल्या इच्छा व्यक्त करते. मागणाऱ्याने देवाकडे दुसरं काही मागू नये म्हणतात. देवाकडे मागण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे. की ‘अनायासेन मरणं....’ म्हणजे मला विनासायास मृत्यू यावा. आयुष्यात दैन्य येऊ नये. मृत्यूच्या वेळी देवाचं सान्निध्य लाभावं. हेच माझं तुझ्याकडे मागणं आहे देवा. असा त्या श्लोकाचा अर्थ आहे.लहानपणी हा श्लोक मी पहिल्यांदा एका कीर्तनकार बुवांच्या तोंडून ऐकला होता. त्यावेळी फारसं काही समजतच नव्हतं. पण मोठी झाल्यावरसुद्धा मला प्रश्न पडायचा की देवाकडे तर अनेक गोष्टी मागितल्या जातात. यशं देहि: धनं देहि: पुत्रं देहि: मागतात. मग परत वर अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं असं का बरं म्हणतात? या श्लोकाचा अर्थ काढण्यासाठी माणसाच्या आयुष्यातले काही जबाबदारीचे पावसाळे पाठी पडावे लागतात. त्यानंतरच त्याला या गोष्टीमागचा अर्थ कळतो की सगळं मागायचं सोडून देवाकडे नेमकं हेच का मागतात लोकं? तर त्याच्या पाठीमागे हजारो, लाखो व्यक्तींचे अनेक वर्षांचे अनुभव असतात. त्यांच्या कडूगोड आठवणी असतात. आयुष्यात नक्की सर्वात महत्त्वाचं काय असतं हे ज्यांना कळलं होतं अशा कोणीतरी व्यक्तीने लिहिलेला तो श्लोक असणार आहे. आयुष्यात माणसाचा शेवट गोड होणं फार महत्त्वाचा असतो

एक वेळ तरुणपण कष्टात गेलं तरी परवडतं. पण म्हातारपण कष्टात न जाता म्हातारपणी कृतार्थ आयुष्य जगायला मिळणार याच्यासारखं गोड काहीच नसतं. पण ज्यांना म्हातारपण सुखासुखी जगायला मिळेल अशी माणसं मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात. काहींना आर्थिक अडचणी असतात. काहींना सामाजिक अडचणी असतात. काहींना मानसिक अडचणी असतात. काहींची अवस्था अतिशय दुर्दैवी असते. म्हणजे याच्यापैकी कोणतीही अडचण त्यांना नसते. पण त्यांचे कुटुंबीयच त्यांना सतत फू फू करून डसत असतात. या बिचाऱ्या गरीब दुर्दैवी जिवांची अवस्था अशी असते, की यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.

अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. अकबराने लोकांना बोलावलं आणि प्रत्येकाला एक एक शेळी दिली. महिन्याच्या शेवटी ती शेळी घेऊन प्रत्येकाने अकबराकडे परत यायचं होतं. महिनाअखेर ज्याच्याकडच्या शेळीचं वजन तेवढेच राहिलेलं असेल त्याला बक्षीस मिळणार होते. आता राजाने दिलेली बकरी म्हणून काहीजण तिला वाटेल तेवढं खायला घालायला लागले. काही जण तिचे वजन वाढू नये म्हणून तिला उपाशी ठेवायला लागले. त्यामुळे काही बकऱ्या लठ्ठ तर काही रोडावल्या. पण एक जण मात्र शहाणा होता तो त्याला मिळालेल्या चतुर सल्ल्याप्रमाणे वागत होता. महिन्याच्या शेवटी सगळेजण बकरी घेऊन आले. तेव्हा त्या चतुर माणसाच्या बकरीचे वजन जेवढ्यास तेवढं भरलं. अकबरालाही आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला विचारलं. त्याने सांगितलं की महाराज दिवसभर मी तिला अगदी मनसोक्त खायला घालत होतो. फिरायला द्यायचो, भरपूर पाणी द्यायचो आणि शेवटी एका भयंकर क्रूर अशा वाघाच्या चित्रासमोर बांधून ठेवायचो. बस्स हेच आहे आजच्या परिस्थितीचे चित्र! किंवा राजसूय यज्ञात भीमाला जेवणाऱ्यांना आग्रह करायचं काम दिलं होतं. पोटभर जेवायला मिळून सुद्धा ब्राह्मण का रोडावले, या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णांना तेव्हा मिळालं जेव्हा त्यांनी भीमाचं वर्तन बघितलं की हवं तेवढंच खा पानात टाकलं तर शेंडीला बांधीन. असा दम देत तो पंगतीत फिरत होता.

या कथा आठवण्याचं कारण एवढंच आहे की तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही चार घास कमी दिले तरी चालतात. पण त्यांच्याशी प्रेमाने वागणं बोलणं, त्यांच्या चुका सांभाळून घेणं हे सर्वतोपरी महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा तेच होत नाही. आम्ही आमच्या घरच्या म्हाताऱ्यांना अगदी थाटात ठेवलं आहे, असं चार लोकांना मोठे कर्णे लावून सांगितलं जातं. प्रत्यक्षात मात्र त्या म्हाताऱ्या जिवांचा पदोपदी अपमान होतो. त्यांना घालूनपाडून बोललं जातं. सदैव टोचलं जातं. त्यात जर का ते मुलासुनेऐवजी मुलीकडे गेले असतील तर त्यांची अवस्था आणखीनच कठीण होते. याबाबत हल्ली समानता आली आहेच. पण काही गोष्टी जुनी माणसं बोलायची त्या सत्य असतात एवढंच.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

तेथे कर माझे जुळती

हे आशाताईंचं गाणं ऐकायला फार सुंदर आहे. पण याचा अनुभव घ्यायला बाहेर जायची काहीच गरज नसते. हे दिव्यत्त्व आपल्या घरातच असतं, आपल्या घरातील वृद्धांच्या रूपाने. आपल्या आई-वडिलांना सांभाळून घ्यावं हे बऱ्याच लोकांना कळत नाही. आपणही कधीकाळी म्हातारे होणार आहोत याची जाणीव त्यांना असत नाही. अलीकडच्या काळात प्रचंड झालेला पैसा, सत्ता, चढत्या बाजूने झालेली आर्थिक सुबत्ता याचा एक न पेलणारा माज मनुष्याला फार आंधळं, बधीर करून सोडत असतो. कारण त्यावेळी त्याची अवस्था अशी असते,

मी राजा आहे काननी वदे तो जंबुक

जोवरी नाही देखिले त्वां सिंहाचे मुख

आयुष्यात ‘सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे’ अशी परिस्थिती असते. सर्व बाजूंनी सगळी सुखं प्रत्येकालाच मिळत नाहीत. आयुष्यात काहीही न करता आपल्या नशिबाने शेवटपर्यंत माज करत जगणारी मंडळीही बघायला मिळतात. आणि आयुष्यात तिळावेळाने झिजूनही शेवटपर्यंत रडावंच लागतं अशा नशिबाची माणसंही असतात. प्रश्न फक्त संस्कारांचा असतो. जो माणूस पैसा राखून असण्यापेक्षाही निगरगट्ट आणि कारस्थानी असतो तो आयुष्यभर गुंडगिरी करूनही माजातच वर जाण्याची आपली सोय करून ठेवू शकतो. कारण त्यासाठी लागणारी पुरेशी गुंड वृत्ती त्याच्याकडे असते. परंतु सर्वसामान्य माणूस असेल तर बहुतांश वृद्धांचं आयुष्य थोडं कठीणच असतं.

सकाळपासून रात्रीपर्यंत रोज रोज गाणी सुचत असतात. सूर कानावर पडत असतात. पण हे सूर सर्व प्रकारचे असतात. त्यातल्या या काही करुण सुरांचा आवाज कानावर पडला आणि मनाला तो लागला. तो अस्तित्वात आहे याची जाणीव इतरांनाही करून द्यावी किंवा त्यांना याबाबतीत सजग करावे यासाठी हा सगळा लेखनप्रपंच आहे. आयुष्यात यमन, वसंत, बहार, केदार, हमीर यासारखे राग जसे असतात तसे त्याच आयुष्यात पूरिया, मारवा विलासखानी तोडी आणि भैरवी यासारखे करुण वृत्तीचे रागही असतात. आणि त्या रागाचे सूर त्या रागाची पकड नक्की कुठे ऐकू येईल हे सांगता येत नसतं.

बेशिस्त आणि उर्मट, गुंड वृत्तीच्या तारुण्याने पदोपदी केलेल्या अपमानानंतर बाहेर पडलेल्या प्रत्येक आक्रोशात करुण सूर असतात आणि हा आक्रोश शेवटपर्यंत तसाच राहिला तर हाच आक्रोश मोठमोठ्या घराण्याला संपवायला मागेपुढे पाहत नाही. तेव्हा वृद्धांना डस्टबिन म्हणणाऱ्यांनी, त्यांना पालापाचोळा समजणाऱ्यांनी किंवा आमच्यामुळे ते जिवंत आहेत अशी दर्पोक्ती करणाऱ्या सगळ्यांनीच ही गोष्ट खरोखरच लक्षात ठेवणे आवश्यक असतं की जगवणारा किंवा मारणारा आणि आपल्या प्रयत्नांना यश देणारा तो परमेश्वरच असतो. आणि आपल्या घरात आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ‘अनायासेन मरणं’ लवकर मागायची वेळ येऊ नये हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. नाहीतर ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे प्रत्येकाच्याच बाबतीत असतं हे निश्चित.

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.