हिंदू मंदिरांचा पैसा हिंदूंवरच खर्च करा
विहिंपचे केंद्र सचिव परांडे यांची मागणी : हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात उठविला आवाज
प्रतिनिधी /बेळगाव
देशातील हिंदू मंदिरांवर सरकारने प्रशासक नेमले आहेत. त्यामुळे हिंदू मंदिरांमधील जमा होणारी देणगी हिंदूंसह इतर धर्मियांवरही खर्ची होते. त्यामुळे देशातील हिंदू मंदिरांमधील प्रशासक हटविण्यासोबतच हिंदू मंदिरांमधील देणगी हिंदू समाजासाठी खर्ची करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली येथील केंद्रीय संघटना सचिव मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेतून केली.
रविवारी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठविला. विश्व हिंदू परिषदेला यावर्षी 68 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने विद्यार्थी, महिला, युवती यांच्यामध्ये देशभर जागृती केली जात आहे. लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. केंद्र अथवा राज्यात हिंदू हिताचा विचार करणारे सरकार येणे ही काळाची गरज आहे. कर्नाटक व प. बंगाल या राज्यांमध्ये तुष्टीकरणाच्या माध्यमातून हिंदूंचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जींची संस्थांना धमकी
ममता बॅनर्जी यांनी तर भारत सेवाश्रम, इस्कॉन, रामकृष्ण मिशन यासारख्या संस्थांना उघडपणे धमकी दिली आहे. हिंदू द्वेषाने प्रेरित झालेल्या काही लोकांकडून अशी कृत्ये केली जात आहेत. कर्नाटकात गोरक्षा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. साधू-संतही सुरक्षित नाहीत. याचा विचार कर्नाटकातील जनतेने करावा, असे ते म्हणाले. यावेळी विहिंपचे प्रांत सचिव शिवकुमार बोळशेट्टी, प्रांत उपाध्यक्ष श्रीकांत कदम, जिल्हाध्यक्ष प्रमोदकुमार यासह इतर उपस्थित होते.