शिवाजी पेठेत भरदिवसा 10 तोळे दागिन्यांवर डल्ला! पाळत ठेवून चोरटयाचे कृत्य
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी पेठेतील एका बंद घरातून भरदिवसा 10 तोळे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. गुरुवारी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आशितोष तानाजी साळोखे (वय 31 रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशितोष साळोखे हे दुपारी घरी काम करीत बसले होते. यावेळी जेवन करण्याठी मरगाई गल्लीतील घराला बाहेरून कडी लावून शेजारीच असणाऱ्या नातेवाईकांच्या घरी जेवणासाठी गेले होते. याच दरम्यान घराची कडी काढून चोरट्याने घरात प्रवेश केला. लोखंडी तिजोरीतील तीन तोळ्याचे जुने वापरातील गंठण, चार तोळयांच्या सोन्याच्या बांगड्या, तीन तोळ्याच्या लहान बांगड्या, कानातील टॉप्स अर्धा तोळे, महागडी पर्स, रोख रक्कम दोन हजार असे 10 तोळे सोन्याचे दागिने व रोखड 6 लाख 11 हजारांचा मुद्देमाल चोरून नेले. तीन वाजता आशितोष साळोखे घरात आल्यानंतर दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जुना राजवाडा पोलिसांना फोन करून चोरीची माहीती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी पंचनामा करून संशयीत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.