For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माता बचावली, मात्र चार बालकांचा दुर्दैवी अंत

12:03 PM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
माता बचावली  मात्र चार बालकांचा दुर्दैवी अंत
Advertisement

कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रकार : विजापूर जिह्यातील बेनाळनजीकची हृदयद्रावक घटना : परिसरात हळहळ

Advertisement

वार्ताहर/जमखंडी 

कौटुंबिक वादातून राग अनावर झाल्याने पोटच्या चार मुलांना कालव्यात ढकलून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न मातेने केला. यात दुर्दैवाने चार मुलांना जलसमाधी मिळाली असून मातेला वाचविण्यात मच्छीमारांना यश आले आहे. सदर घटना सोमवारी विजापूर जिह्यातील निडगुंदी तालुक्यातील बेनाळनजीक अलमट्टीच्या डाव्या कालव्यात घडली. तनु बजंत्री (वय 5), रक्षा बजंत्री (वय 3), हसन बजंत्री  व हुसेन बजंत्री (दोघांचे वय 13 महिने) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. तर भाग्या निंगराज बजंत्री (वय 30, रा. तेलगी, तालुका कोलार) असे बचावलेल्या मातेचे नाव आहे. घटनेविषयी समजलेली माहिती अशी, भाग्या हिचा पती निंगराज याचा आपल्या भावांसोबत मालमत्तेवरुन वाद सुरू होता. यावेळी भावांनी निंगराज याला मालमत्तेतील वाटा देण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन सोमवारी त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली.

Advertisement

त्यानंतर निंगराज हा पत्नी भाग्या व मुलांसह घरी जात होता. यावेळी वाटेतील कालव्यानजीक आले असता गाडीतील पेट्रोल संपल्याने ते थांबले. यावेळी निंगराज पेट्रोल आणण्यासाठी भाग्या व मुलांना तेथेच सोडून गेला. याचवेळी भाग्या हिने आपल्या चारही मुलांना कालव्यात ढकलून दिले. यानंतर स्वत:ही कालव्यात उडी घेतली. दरम्यान सदर प्रकार शेजारील नागरिक व मच्छिमारांना समजताच त्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन भाग्या हिला वाचविण्यात यश मिळविले. मात्र चारही मुलांना जलसमाधी मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतदेहांचे शोधकार्य सुरु केले. त्यात तनू व रक्षा या दोन मुलींचे मृतदेह कालव्याबाहेर काढण्यात यश आले असून अन्य हसन व हुसेन यांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पती निंगराज व कुटुंबीयांनी धाव घेत हंबरडा फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.