शहरातील गतिरोधक धोकादायक स्थितीत
गतिरोधक उखडून गेल्याने वाहनचालकांना धोका : महानगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : शहरात ठिकठिकाणी घालण्यात आलेले गतिरोधक पावसामुळे उखडून गेले आहेत. त्यामुळे हे गतिरोधक धोकादायक बनले असून वाहनांना अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. तरीदेखील गतिरोधकांची दुरुस्ती किंवा नवीन गतिरोधक घालण्याकडे रहदारी पोलीस व महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्मार्ट सिटी योजनेतून शहर व उपनगरात काँक्रिटचे रस्ते करण्यात आले आहेत. मात्र, ज्या ठिकाणी गतिरोधकांची गरज आहे, त्या ठिकाणी काँक्रिटचे गतिरोधक घालणे गरजेचे होते. पण ते घालण्यात आले नसल्याने काही ठिकाणी अपघातांचा धोका वाढला होता.
शहरातील मुख्य रस्त्यांवर गतिरोधक घालण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून काँक्रिटच्या रस्त्यावर डांबराचे गतिरोधक घालण्यात आले होते. पण यंदा झालेल्या संततधार पावसामुळे डांबराचे गतिरोधक उखडून गेले आहेत. तशा गतिरोधकांवरून ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अपघातदेखील घडत आहेत. विशेषकरून काँग्रेस रोड, खानापूर रोड व कॅम्प परिसरात धोकादायक गतिरोधक आहेत. त्यामुळे याकडे रहदारी पोलीस व महापालिकेने लक्ष घालून धोकादायक गतिरोधकांची दुरुस्ती किंवा नवीन गतिरोधक घालण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.