महामार्गावर तीन ठिकाणी गतिरोधक बसवणार
रत्नागिरी :
नुकत्याच चिपळूण-बावनदी येथे झालेल्या अपघातानंतर आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघातप्रवण क्षेत्रासंदर्भात महत्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महामार्गावरील बावनदीसह, अंजणारी आणि वेरळ येथे आता गतिरोधक बसवण्यात यावा, या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. खासदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या अपघात निवारण समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणे ही सातत्याने होणाऱ्या अपघातानंतर आता अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जावू लागली आहेत. अशा अपघातप्रवण क्षेत्रावर आता गतिरोधक बसवण्यासंदर्भात प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. नुकताच बावनदी येथे एका गॅसवाहू टँकरने प्रशिक्षणासाठी निघालेल्या शिक्षकांच्या मिनी बसला टक्कर दिली आणि या अपघातात 31 जण जखमी झाले. यापैकी तिघेजण गंभीर जखमी झाले.
या अपघातातनंतर आता बावनदी परिसरात सतत होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणाकडे सगळ्dयांचेच लक्ष वेधले आहे. महामार्गाचे काम सुऊ असल्यापासून या परिसरात 20 पेक्षा जास्त अपघात झाल्याचे आता समोर आले आहे. निवळी परिसरातील कोकजेवठार या ठिकाणावरून सुऊ होणारा तीव्र उतार आणि वळण यामुळे कोकजेवठारपासून खाली येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. अशातच गॅस टँकर, केमिकल टँकर तसेच मोठमोठ्या अवजड वाहनांची वाहतूक होत असताना या परिसरात वाहनांचा ताबा सुटण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे या परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी येथे गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहे. बावनदीप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गावर अंजणारी व वेरळ येथेही अपघाताचे प्रमाण जास्त आहे आणि येथेही गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.
राज्य मार्ग तसेच महामार्गावर कोणतेही गतिरोधक बसवण्यात येवू नयेत, अशा सूचना उच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या, मात्र असे गतिरोधक बसवण्यासंदर्भात आता जिह्यातील अपघात निवारण समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होणार असल्याचेही सांगण्यात आले. खासदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत यापूर्वीही अशा 9 ठिकाणांवर गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यापैकी चिपळूण पॉवर हाऊस आणि गुहागर बायपास या ठिकाणीच असे गतिरोधक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आता 16 तारखेला होणाऱ्या या बैठकीत प्रस्तावित ठिकाणावर गतिरोधक बसवण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळते का, याकडे सगळ्dयांचे लक्ष लागून राहिले आहे.