For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेन, इटली यांचे शानदार विजय

06:45 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पेन  इटली यांचे शानदार विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन, डॉर्टमंड

Advertisement

जर्मनीत सुरु झालेल्या 2024 च्या युरोपीयन चॅम्पियनशिप चषक फुटबॉल स्पर्धेत नव्या पिढीतील युवा फुटबॉलपटूंनी आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर स्पेनला एकतर्फी विजय मिळवून दिला. या सामन्यात स्पेनने क्रोएशियाचा 3-0 असा दणदणीत पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. दुसऱ्या एका सामन्यात इटलीने अल्बेनियावर 2-1 असा विजय मिळविला.

या स्पर्धेतील पहिल्या दिवशी यजमान जर्मनीने विजयी सलामी दिली होती. त्यानंतर शनिवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात स्पेनने क्रोएशियाचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात स्पेनचे प्रतिनिधीत्व करणारा लेमिने यमाल हा युरोपीयन चॅम्पियनशिप स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा फुटबॉलपटू ठरला आहे. यमालने आपल्या वयाच्या 16 वर्षे आणि 338 दिवस पूर्ण केले असून त्याने या स्पर्धेत आपल्या संघाचा तिसरा गोल करण्यामध्ये हातभार लावला. यमालने दिलेल्या पासवर डॅनी कार्व्हाजेलने स्पेनचा तिसरा गोल नोंदविला. स्पेनच्या मध्यफळीत खेळणाऱ्या फॅबीयन रुझने 1 गोल नोंदविला. सामन्यातील 80 व्या मिनिटाला स्पेनचा गोलरक्षक सिमॉनने क्रोएशियाचा बदली खेळाडू पेटकोव्हीतने पेनल्टीवर मारलेला फटका अचूकपणे थोपविला. पण त्यानंतर रिबाँडमध्ये पेरीसीकने चेंडू गोलपोस्टमध्ये लाथाडला. पण व्हीएआर रिह्युवमध्ये पेरीसीकचा हा गोल फेटाळण्यात आला. स्पेनचा पहिला गोल कर्णधार अल्व्हारो मोराटाने केला. क्रोएशियाच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत स्पेनच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण त्यांना आपले खाते उघडता आले नाही. स्पेनने आतापर्यंत तीन वेळेला युरोपीयन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. आता या स्पर्धेतील क्रोएशियाचा पुढील सामना अल्बेनियाबरोबर हॅमबुर्गमध्ये येत्या बुधवारी तर स्पेनचा सामना इटलीबरोबर येत्या गुरुवारी खेळविला जाणार आहे.

Advertisement

इटलीचा निसटता विजय

या स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात इटलीने अल्बेनियाचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर केवळ 23 व्या सेकंदाला अल्बेनियाने आपले खाते उघडले होते. या सामन्याला अल्बेनियाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका गोलाने पिछाडीवर असलेल्या इटलीने त्यानंतर आपल्या वेगवान आणि जलद खेळावर अधिक भर देत अल्बेनियाचे आव्हान संपुष्टात आणले. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर नेडिम बेजरामीने चेंडूवर ताबा मिळवत इटलीच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि त्याने इटलीच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत अल्बेनियाचे खाते उघडले. 11 व्या मिनिटाला बॅस्टोनिने इटलीचे खाते हेडरद्वारे गोल करत अल्बेनियाशी बरोबरी साधली. 16 व्या मिनिटाला निकोलो बॅरेलाने अल्बेनियाची बचावफळी भेदत इटलीचा दुसरा गोल केला. यानंतर अल्बेनियाला शेवटपर्यंत इटलीशी बरोबरी साधता आली नाही. 2021 साली झालेल्या युरोपीयन चॅम्पियनशिप फुटाबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले होते. मात्र यावेळी इटलीच्या संघामध्ये अनेक नवोदितांचा समावेश करण्यात आला असून त्यांना प्रशिक्षक स्पॅलेटीचे मार्गदर्शन मिळत आहे. ब गटातील इटलीने हा पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे.

सामन्यांचे निकाल

स्पेन वि.वि. क्रोएशिया : 3-0

इटली वि.वि. अल्बेनिया : 2-1

Advertisement
Tags :

.