हुबळी-पंढरपूर मार्गावर कार्तिक एकादशीनिमित्त विशेष रेल्वे
बेळगावसह खानापूर, लोंढा येथील वारकऱ्यांना होणार लाभ
बेळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी-पंढरपूर मार्गावर रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत या रेल्वेफेरींचा भाविकांना लाभ घेता येणार आहे. स्लीपरसह जनरल डबे या रेल्वेला जोडण्यात आल्याने वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. दि. 29, 30 व 31 ऑक्टोबर व 1, 2, 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.10 वा. हुबळी येथून निघालेली रेल्वे सायंकाळी 4 वा. पंढरपूरला पोहोचेल व त्यादिवशी पुन्हा माघारी प्रवास करणार आहे. सायंकाळी 6 वा. पंढरपूर येथून निघालेली रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वा. हुबळीला पोहोचेल. या रेल्वेला धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, धळगाव, जत रोड, वसूड, सांगोला असे थांबे देण्यात आले आहेत.
वारकऱ्यांच्या मागणीला यश
बेळगावमधून पंढरपूरला रेल्वे सोडण्याची मागणी विविध वारकरी संघटनांनी केली होती. काही दिवसांपूर्वी कलखांब येथील वारकऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे मागणी केली होती. तर जोयडा येथील वारकऱ्यांनी आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांना निवेदन पाठविले होते. या सर्व मागण्यांना अखेर यश मिळाले आहे.