कार्तिक वारीसाठी हुबळी-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे
आजपासून धावणार रेल्वे : बेळगावच्या वारकऱ्यांची होणार सोय
बेळगाव : कार्तिक एकादशीनिमित्त शेकडो वारकरी पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी जातात. नैर्त्रुत्य रेल्वेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी हुबळी पंढरपूर विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. बेळगावसह परिसरातून हजारो भाविक कार्तिक वारीला जाणार असल्याने विशेष रेल्वेमुळे त्यांची सोय होणार आहे. 07313 एक्स्प्रेस हुबळी-पंढरपूर या मार्गावर धावणार आहे. दि. 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान एक्स्प्रेस सुरू ठेवली जाणार आहे. रात्री 7.45 वाजता हुबळी येथून एक्स्प्रेस निघणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात पहाटे सहा वाजता पंढरपूर येथून निघालेली एक्स्प्रेस सायंकाळी 4.30 वाजता हुबळीला पोहोचेल.
या रेल्वेला धारवाड, अळणावर, लेंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाश्चापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, सांगोला असे थांबे देण्यात आले आहेत. एकूण 12 डबे रेल्वेला जोडले जाणार असून यापैकी 10 डबे जनरल असणार आहेत. आषाढी वारीवेळी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी होत होती. परंतु त्या दरम्यान दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे सोडता आली नव्हती. त्यावेळी यशवंतपूर-पंढरपूर रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु त्यामध्ये स्लीपर कोच अधिक असल्यामुळे तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या विशेष रेल्वेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.