युक्रेनमध्ये विशेष शाळांची होतेय निर्मिती
रशिया-युक्रेन युद्धाने तेथील मुलांच्या शिक्षणावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनला शाळा बंद कराव्या लागल्या, यामुळे मुलांचे वर्ग केवळ ऑनलाइन पुरती मर्यादित राहिले. आता तीन वर्षांनी मायकोलाइव शहरातील शाळा पुन्हा सुरू करण्यात आली आहे, परंतु ही शाळा जमिनीपासून सुमारे 7 फूट खाली शेल्टरच्या स्वरुपात निर्माण करण्यात आली. मुलांना सुरक्षित वातावरणात शिकता यावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मायकोलाइव शहरात 2022 पासून मुलांनी ऑफलाइन शाळेचे दर्शनही केले नव्हते. ही शाळा 2022 पासून बंद होती, चालू आठवड्यात शेल्टरसोबत ही शाळा सुरू करण्यात आली. रशियाच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच युक्रेनच्या या शहरात 53 विद्यार्थी शिकण्यासाठी पुन्हा शाळेत परतले आहेत. येथे युनिसेफच्या निधीच्या मदतीने शेल्टर स्कूल उभारण्यात आले आहे. ही शाळा मुलांच्या सुरक्षेला विचारात घेत जमिनीच्या 7 फूट खाली निर्माण करण्यात आली आहे.

मुलांनी व्यक्त केले दु:ख
16 वर्षीय डारिया ही मुलगी या शाळेत शिकते. युद्धापूर्वी आपली शाळा कशी दिसायची हे देखील तिला आता आठवत नाही. युद्धापूर्वीच्या शालेय जीवनाविषयी मला काहीच आठवत नाही, माझे आयुष्य युद्धापूर्वी आणि युद्धानंतर अशा टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. युद्धामुळे माझ्याकडे आता कुठल्याही खास आठवणी राहिल्या नाहीत, असे 11 वीत शिकणारी डारिया सांगते.
प्रथम कोरोना, मग युद्ध
ही शाळा प्रथम 2022 मध्ये कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आली होती. मग 2021 मध्ये हायब्रिड मॉडेलने शिक्षण सुरू करण्यात आले, परंतु 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे शाळा पुन्हा बंद करावी लागली. आता सुरक्षा व्यवस्थेसह ही शाळा एका नव्यात रुपात मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे. आम्ही ऑनलाइन वर्गाला वैतागून गेलो आहोत, आता शाळेत जात नवे मित्र जोडू इच्छितो, असे अनेक मुलांचे सांगणे आहे.
मुलांना शिफ्टनुसार शिकविण्याचा प्रकार
युक्रेनच्या लायसीयम नंबर 53 मध्ये जवळपास 1 हजार विद्यार्थी आहेत, परंतु यातील 300 विद्यार्थी अद्याप रिमोट लर्निंग करत आहेत. यात छोट्या मुलांना सकाळच्या शिफ्टमध्ये तर मोठ्या मुलांना त्यानंतरच्या शिफ्टमध्ये शिकविण्यात येते. युनिसेफने मायकोलाइव क्षेत्रात स्थानिक प्रशासनासोबत मिळून शेल्टर स्कूल निर्माण करण्यास आर्थिक मदत केली आहे. यामुळे मुलांना आता शाळेत जात शिकता येत आहे.