राज्यात दुग्धजन्य जनावरांची विशेष नोंद
सरकारची योजना : दूध उत्पादनाला प्रोत्साहन, राज्यात 1.14 कोटी जनावरांची संख्या
बेळगाव : कृषीप्रधान भारत देशात शेतीबरोबर जनावरे पाळणे, दुग्धउत्पादन हे जोड व्यवसाय म्हणून केले जातात. कर्नाटक राज्यापुरता विचार करता राज्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 1.14 कोटी जनावरांपैकी अधिक दूध देणाऱ्या 22 हजार 822 म्हशी व गायी असून यांना एलाईट अॅनिमल्स म्हणजेच दर्जेदार जनावरे अशी नोंद करून या जनावरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने योजना तयार करण्यात आली आहे.
केंद्रीय पशुसंगोपन-दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने जारी केलेल्या नूतन ‘सुरभी चयन शृंखला’ योजनेंतर्गत निवड करून त्यांचे गट करण्यात आले आहेत. ठराविक दर्जाच्या गायी व म्हशींना दूध देण्याचे प्रमाण निर्धारित करून त्यानुसार तंत्रज्ञानाद्वारे तसेच वैज्ञानिक़दृष्ट्या सर्वाधिक दूध देणाऱ्या जनावरांची गणती घरोघरी भेट देऊन करण्यात आली आहे. जनावरांचे दूध देण्याचे प्रमाण लक्षात घेऊन जनावरांच्या कानाला टॅग लावून भारत पशुधन अॅपमध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात म्हैस व गायींचे प्रकार निवडण्यात आले आहेत. आता 31 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दूध देणाऱ्या जनावरांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा जनावरांनी नर जातीच्या रेडकू किंवा वासराला जन्म दिल्यास त्यांचे कृत्रिम गर्भधारणेद्वारे पिल्लांचे संरक्षण करण्यात येणार आहे. अशा जनावरांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 7 केंद्रीय जनावरांचे पाडस संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. 165 केंद्रांसह एकूण 172 स्थानिक पाडस संगोपन केंद्रे सुरू आहेत. पुढील दिवसात कमी जनावरे संगोपन करून अधिकाधिक दूध उत्पादन करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
वार्षिक 240 दशलक्ष टन दूध उत्पादन

भारत देश हा 1998 पासून जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा आहे. वार्षिक 240 दशलक्ष टन दूध उत्पादन होत असते. देशात जनावरांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. 2019 मध्ये झालेल्या 20 व्या जनावरांच्या गणतीनुसार 193.46 दशलक्ष गायी व 109.85 दशलक्ष म्हशी आहेत. कर्नाटक राज्यात जनावरांची संख्या (गायी व म्हशी) 1.14 कोटी आहे.