दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहनकडून विशेष बसेस
71 बसेस विविध मार्गांवर धावणार : सणाला गावी परतण्याची लगबग : प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन
बेळगाव : दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. यामुळे विविध भागात वास्तव्यास असलेले नागरिक सणाला आपापल्या गावी परतण्यासाठी लगबग करत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून विविध मार्गांवर विशेष बसेस सोडण्यात येणार असून दि. 18 ते 26 ऑक्टोबरअखेर 71 बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये स्लीपर, नॉन स्लीपर व रेग्युलर बसेसचा समावेश असून विविध मार्गांवर प्रवास करणार आहेत. याचा नागरिकांना लाभ होणार आहे.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. यामुळे विविध भागात असणारे लोक सणानिमित्त आपापल्या गावी येत असतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेंगळूर, मुंबई, पुणे, पणजी आदी मार्गांवर विशेष बस सुविधा पुरविण्यात येत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विविध श्रेणीतील बसेस सोडण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांची बसेसविना होणारी हेळसांड कमी होणार आहे.
परिवहन विभागाकडून यात्रा, उत्सव व सणासुदीच्या काळात अतिरिक्त बससेवा पुरविली जाते. बसेसविना प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. दि. 18 ते 19 ऑक्टोबरअखेर बेंगळूरहून मुंबई, पुणे, पणजी व बेळगावला जाण्यासाठी अधिक बसेस सोडण्यात येत आहेत. दि. 22 आणि 26 ऑक्टोबर रोजी पुन्हा सदर शहरांमध्ये परतणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष बसेस सोडण्याचे नियोजन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
18 रोजी बेंगळूर ते बेळगाव विभाग मल्टीएक्सल 1, एसी स्लीपर 1, नॉन एसी स्लीपर 1, राजहंस 2, विकेंड स्पेशल (व्हीकेएस) 10, बेंगळूर ते मुंबई व्हीकेएस 1, बेंगळूर ते पुणे व्हीकेएस 6, बेंगळूर ते पणजी व्हीकेएस 1 तर दि. 19 रोजी बेंगळूर मार्गावरून व्हीकेएस 3 बसेस सोडण्यात येणार आहेत. अशाप्रकारे या दोन दिवसांत 26 बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी आगाऊ बुकिंग करून प्रवाशांना प्रवास करता येणार असून परिहवन मंडळाच्या वेबसाईटवरून किंवा बसस्थानकात तिकीट बुक करता येणार आहे.
दि. 22 रोजी बेळगावहून मल्टीएक्सल 1, एसी स्लीपर 1, नॉन एसी स्लीपर 1, राजहंस 2, व्हीकेएस 6, बेळगाव ते मुंबई व्हीकेएस 2, बेळगाव ते पुणे 6, बेळगाव ते पणजी 2 तर 26 रोजी बेळगाव ते बेंगळूर मल्टीएक्सल 1, एसी स्लीपर 1, नॉन एसी स्लीपर 1, राजहंस 2, व्हीकेएस 10, बेळगाव ते मुंबई 1, बेळगाव ते पुणे व्हीकेएस 6, बेळगाव ते पणजी व्हीकेएस 2 अशा एकूण 45 बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी परिवहन मंडळाच्या वेबसाईटवरून किंवा बसस्थानकांतून तिकीट बुक करता येणार आहेत.