भ्रूणहत्या रोखण्यासाठी विशेष कायदा
आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली माहिती : विधानपरिषदेत प्रदीर्घ चर्चा
लिंगनिदान करून भ्रूणहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्यात घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्त्राr भ्रूणहत्या म्हणजे हा एक प्रकारचा खूनच आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य खाते व पोलीस खाते संयुक्तपणे कारवाई करावी, यासाठी भविष्यात उपाय योजना राबविण्यात येणार आहेत. सध्या असणाऱ्या कायद्यामध्ये बदल करून विशेष कायदा जारी केला जाणार आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस व आरोग्य खात्याकडून कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील, यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या राज्यात घडलेल्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून लवकरच सध्या असणाऱ्या कायद्यात बदल करून अशा प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाईल, असे गुंडूराव यांनी सांगितले. लिंगनिदान करून भ्रूणहत्या करणाऱ्यांविरोधात साक्षी, पुरावे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच पोलीस व आरोग्य खात्याकडून संयुक्त मोहीम राबविणे आवश्यक आहे. इंटेलिजन्स विभागाचाही यामध्ये समावेश केला जाईल, जेणेकरून अशा घृणास्पद घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर साक्षी, पुरावे जमा करणे सोयीचे ठरणार आहे. न्यायालयामध्ये भक्कम पुरावे सादर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास मदत मिळणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांची मदत घेणे
विविध योजना घरोघरी पोहोचविण्यामध्ये अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांची मदत घेतली जाते. या कर्मचाऱ्यांचा प्रत्येक नागरिकाशी व कुटुंबाशी संबंध आलेला असतो. त्यांना गावातील सर्व माहिती असते. कोणत्या ठिकाणी गैरप्रकार चालतात याची जाणीव असते. यासाठी या कर्मचाऱ्यांची मदत घेणे आवश्यक असल्याचे मतही सदस्यांनी मांडले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर
स्त्राr भ्रूणहत्या प्रकरणे वाढल्यामुळेच पुऊष व महिला यांच्यातील संख्येत विषमता निर्माण झाली आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आधुनिक काळात अनेक तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात उपयोग करुन घेतला जात आहे. एकादृष्टीने तंत्रज्ञान माणसासाठी अधिक सोयीचे ठरत आहे. तर दुसरीकडे याचा दुरुपयोगही करुन घेतला जात आहे. गर्भाशयात असणारे भ्रूण सक्षम आहे का? हे पाहण्यासाठी स्कॅन्ंिांगचा उपयोग करणे गरजेचे आहे. असे असले तरी अनेक जण लिंग निदान करुन भ्रूणहत्या करत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदे व नियम जारी करणार असल्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.