सभापती डॉ.गणेश गावकर यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट
गोव्यासंबंधी तीन प्रस्तावांची निवेदने सादर
धारबांदोडा : सावर्डे मतदारसंघासाठी महत्त्वाचे विकासात्मक प्रस्ताव पुढे नेण्यासाठी गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश चंद्रू गावकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. बैठकीदरम्यान डॉ. गावकर यांनी पायाभूत सुविधा,कनेक्टिव्हिटी आणि युवा सक्षमीकरण या विषयावर तीन औपचारिक निवेदने सादर केली. यावेळी ‘मी गणेश गावकर’ या मराठी आत्मचरित्राची प्रत त्यांना भेटस्वरूप दिली.
पहिल्या प्रस्तावात केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा फंड अंतर्गत एमडीआर-52 आणि कुळे रेल्वेस्थानक लिंक रोडचे मजबुतीकरण आणि हॉटमिक्सिंगसाठी मंजुरीची मागणी करण्यात आली. गोवा मल्टि फॅकल्टी महाविद्यालयासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व भागीदारी सुलभ करण्यावर केंद्रित करण्यासाठी भर दिला. आदिवासी समाजबांधवांच्या सक्षमीकरणासंबंधीचा प्रस्ताव गावकर यांनी गडकरींना दिला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संधी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, डिजिटल वर्गखोल्या, करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट लिंकेजसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली.
तिसऱ्या प्रस्तावात बेळगाव ते पणजी यांना जोडणारा एक धोरणात्मक कॉरिडॉर, राष्ट्रीय महामार्ग-748 च्या प्रलंबित चौपदरी मार्गासाठी संबंधित होता. डीपीआर-तयार करणाऱ्या विभागांना लवकर मंजुरी देण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सर्व निवेदनांवर सकारात्मक चर्चा केली. मंत्रालयाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. डॉ. गावकर यांनी केंद्र सरकारकडून गोवा राज्याला मिळत असलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.