पक्षाच्या मर्यादा पाळून बोला!
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस हायकमांडचा पक्षनेत्यांना सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्याबाबत नेत्यांच्या विधानांवरून झालेल्या निषेधानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या नेत्यांना सूचना जारी केल्या आहेत. पक्षाने नेत्यांना या मुद्द्यावर पक्षाच्या रेषेबाहेर विधाने करणे टाळण्यास सांगितले आहे. पक्षाकडून देण्यात आलेल्या या निर्देशांवरून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी नेत्यांच्या विधानांवर नाराज असल्याचे दिसत आहेत.
काँग्रेस हायकमांडने सर्व नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. सर्व नेत्यांना पहलगाम मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेनुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पक्षाची एकता आणि संघटनात्मक शिस्त राखण्यासाठी पक्षाच्या हायकमांडने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच, पक्षाच्या मार्गापासून दूर जाणाऱ्या नेत्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर भाजपची टीका
पहलगाम हल्ल्याबाबत काही विरोधी नेत्यांच्या विधानांवर भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी टीका केली होती. काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांचा उद्देश काय आहे?... अशी विचारणा रविशंकर प्रसाद यांनी केली. तसेच पाकिस्तानमधील टीव्हीवर काँग्रेस नेत्यांची विधाने दाखवली जात असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकचे मंत्री दहशतवादी हल्ल्याबाबत बेभान वक्तव्ये करत असल्याबाबत त्यांनी काँग्रेस हायकमांडला धारेवर धरले आहे.