स्पेनचा विजयी प्रारंभ,
बरोबरीसाठी अर्जेन्टिनाचा संघर्ष पॅरिस ऑलिम्पिक फुटबॉल : स्पेनचे उझ्बेकवर मात
वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिक स्पर्धेच्या अधिकृत शुभारंभाच्या दोन दिवस आधी फुटबॉल, रग्बी या सामन्यांना बुधवारी सुरुवात झाली असून फुटबॉलच्या स्पेनने क गटातील पहिल्या सामन्यात उझ्बेकिस्तानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला तर ब गटात अर्जेन्टिना व मोरोक्को यांच्यातील रोमांचक सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.
धोकादायक ठरणाऱ्या उझ्बेकिस्तानवर स्पेनच्या पुरुष फुटबॉल संघाने ऑलिम्पिकची विजयी सुरुवात करण्यात यश मिळविले. सामनावीर सर्जिओ गोमेझ त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पहिला गोल नोंदवण्यातही मदत केली होती. ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या उझ्बेकने प्रारंभापासून जबरदस्त आक्रमक खेळ केला आणि पूर्वार्धात त्यांनी स्पेनवरच वर्चस्व गाजवले. 29 व्या मिनिटाला मार्क प्युबिलने गोल नोंदवून स्पेनला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांना मध्यंतरापर्यंतच टिकविता आली. पूर्वार्ध संपण्याच्या ठोक्याला मिळालेल्या पेनल्टीवर एल्डर शोमुरोडोव्हने गोल नोंदवून उझ्बेकला बरोबरी साधून दिली.
उत्तरार्धात स्पेनच्या गोमेझने पेनल्टी हुकवली. पण नंतर त्याची भरपाई करताना त्यानेच स्पेनचा विजयी गोल नोंदवला. उझ्बेकने अखेरच्या टप्प्यात बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण स्पेनने आघाडी अखेरपर्यंत टिकवण्यात यश मिळविले. स्पेनने विजय मिळविला असला तरी उझ्बेकच्या शानदार खेळाचे चाहत्यांनी कौतुक केले.
अर्जेन्टिना-मोरोक्को बरोबरीत
सेंट एटीने येथे झालेल्या ब गटातील अर्जेन्टिना व मोरोक्को यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. मेस्सीशिवाय खेळणारे अजेन्टिना हा सामना गमावणार असे वाटत असतानाच अखेरच्या क्षणी क्रिस्टियन मेदिनाने गोल नोंदवून पराभव टाळत अर्जेन्टिनाला बरोबरी साधून दिली. गोल झाल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानात घुसखोरी केल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याने खेळ थांबवण्यात आला. पण सामना संपल्याचे समजून दोन्ही संघ मैदानाबाहेर निघाले असताना सामना पूर्ण झाला नसून तो थांबवण्यात आल्याचे त्यांना समजले. पूर्वार्ध संपण्याच्या सुमारास मोरोक्कोचे गोल सौफियान रहिमीने अश्रफ हकिमीच्या पासवर नोंदवला. रहिमीने नंतर 49 व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर दुसरा गोल नोंदवला. 68 व्या मिनिटाला गुलिर्मो सायमोनने अर्जेन्टिनाचा गोल नोंदवून मोरोक्कोची आघाडी कमी केली. स्टॉपेज टाईमच्या 16 व्या मिनिटाला मेदिनाने अर्जेन्टिनाचा दुसरा गोल नोंदवल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानात घुसून हुल्लडबाजी सुरू केली. बराच वेळ सामना संपल्याची घोषणा करण्यात आली नव्हती.