महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जर्मनीत स्पेनचा ‘फ्लॅमेंको’ !

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी अन् दुसऱ्या दशकाच्या आरंभी जागतिक फुटबॉलमध्ये जबरदस्त दबदबा राहिला तो स्पेनचा...कासिलास, टोरेस, फाब्रिगास, विला, शावी हर्नांडेझ, शाबी, इनेस्टा अशी ती तुफानी पलटण मैदानावर उतरण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणणारी...त्या तुलनेत यंदाच्या ‘युरो’मध्ये उतरलेल्या स्पॅनिश संघात तशा प्रकरची भारी नावं नव्हतीच. तरीही जर्मन भूमीवर दर्शन घडलं ते स्पेनचं राष्ट्रीय नृत्य असलेल्या ‘फ्लॅमेंको’चंच अन् त्यापुढं भलेभले दिग्गज गारद झाले...

Advertisement

‘तो’ युवा संघ यजमान जर्मनीच्या विमानतळावर उतरला तेव्हा ‘त्यांच्या’कडून अपेक्षा फारशा नव्हत्याच...शिवाय फुटबॉलवेडे रसिक शोधत होते ते ‘त्या’तील प्रसिद्ध खेळाडूंचे चेहरे...परंतु सहा आठवड्यांच्या कालावधीनंतर कर्णधार आल्वारो मोराटाचा चमू ‘युरोपियन चषक’ घेऊन स्पेनच्या दिशेनं कधी पळाला ते भल्या भल्या जागतिक विश्लेषकांना देखील कळलं नाही, समजलं नाही...आणि मग अचानक साऱ्या विश्वाला त्या ‘टीम’च्या क्षमतेची कल्पना आली...

Advertisement

यमाल नि निको विल्यम्स (22 वर्षं 2 दिवस वयाचा हा खेळाडू ‘युरो’ चषकाच्या अंतिम सामन्यात गोल नोंदविणारा दुसऱ्या क्रमांकाचा तरुण खेळाडू ठरला. शिवाय त्या लढतीचा ‘सामनावीर’ पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला तो त्यालाच) या युवा खेळाडूंचा ‘पर्फेक्ट’ ताळमेळ अन् त्यांना मिळालेली अनुभवी रोद्री नि इतरांची साथ यांनी स्पेनला अभूतपूर्व यश मिळवून दिलंय...विशेष म्हणजे वरील खेळाडूंना त्यापूर्वी एखाद्या प्रमुख चषकाचं दर्शन कधीही घडलेलं नव्हतं. रविवारी झालेल्या ‘युरो 2024’च्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर 2-1 अशी मात केल्यानं त्यांची स्वप्नं अक्षरश: क्षणार्धात पूर्ण झाली. स्पर्धेतील सर्वांत मोठी बाब म्हणजे स्पेननं नाव कमावलं ते आक्रमक शैलीनं खेळणारा संघ म्हणून व त्यामुळं सुटका झाली ती गेल्या 10 वर्षांतील ‘टिकी-टाका’ पद्धतीतून (मोठ्या प्रमाणात छोटे पासेस पुरविणं)...

सामन्याच्या 47 व्या मिनिटाला स्पेनचा पहिला गोल नोंदविणारा विल्यम्स म्हणाला, ‘मला आशा आहे की, येऊ घातलेल्या दिवसांत सध्याच्या शैलीत बदल होणार नाही आणि विश्वचषक स्पर्धेत सुद्धा यश मिळविण्याची क्षमता संघात दडलीय’...स्पॅनिश खेळाडूंच्या, त्या राष्ट्रातील फुटबॉलवेड्या रसिकांच्या उत्साहानं अवकाशात झेप घेतलीय आणि त्यात काहीही वावगं नाही. कारण स्पेननं सर्व सात सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं ते पेनल्टी शूटआऊटचा आधार न घेता. त्यांनी युरोपियन स्पर्धेतील विक्रमी 15 गोलांची नोंदही केली. स्पेननं गटात क्रोएशिया अन् इटलीचा फडशा पाडला, तर अंतिम सामन्याला धडक देण्यापूर्वी धूळ चारली ती जर्मनी नि फ्रान्सला...

रोद्री म्हणतो, ‘आम्ही नवीन इतिहास लिहिलाय. कारण स्पनेनं पराभव केला तो चार जगज्जेत्यांचा’...विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या मध्यंतरानंतरच्या 45 मिनिटांत दुखापतीमुळं रोद्रीला खेळणं जमलं नाही. पण या ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून निवड झाली ती त्याचीच...गेली तब्बल 12 वर्षं स्पेन आतूरतेनं एखाद्या प्रमुख स्पर्धेच्या जेतेपदाची वाट पाहत होता अन् ती इच्छा शेवटी पूर्ण झालीय. आंद्रे इनेस्टा आणि शावी हर्नांडेझ या विश्वविख्यात फुटबॉलपटूंच्या चमूनं 2008 अन् 2012 मध्ये झालेल्या ‘युरो’ स्पर्धा जिंकल्या होत्या व 2010 सालच्या विश्वचषकावरही ताबा मिळविला होता...

रोद्रीनं म्हटलंय की, निवृत्त झालेल्या महान खेळाडूंनी आम्हाला वाट दाखविली नि आम्ही त्यावरून प्रवास केला...स्पॅनिश संघातील एखाद्या प्रमुख चषकाचं दर्शन घेतलेला एकमेव खेळाडू म्हणजे 38 वर्षांचा जिझस नावास. त्याला 2010 सालच्या विश्वचषक स्पर्धेत नि 2012 सालच्या ‘युरो’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे स्पेनचं यश पाहण्यासाठी स्टेडियममध्ये इनेस्टा, शावी, त्यांचा माजी खतरनाक ‘स्ट्रायकर’ डेव्हिड विला हजर होते. त्यांना पाहायला मिळाली ती युवा स्पॅनिश खेळाडूंची नवीन आक्रमक शैली...

दरम्यान, उपविजेत्या इंग्लंडच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब म्हणजे 1966 साली विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांना गेल्या 58 वर्षांत एकही प्रमुख जेतेपदाचं दर्शन घेता आलेला नाही आणि ती परंपरा मोडणं यंदाही त्यांना जमलं नाहीये...तथापि, इंग्लिश इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे गॅरेथ साऊथगेट यांच्यावर मात्र राजीनामा देण्याची पाळी आलीय. त्यांच्या कारकिर्दीत यंदाप्रमाणं 2021 मध्ये सुद्धा ‘युरो’ची अंतिम फेरी इंग्लंडनं गाठली होती. शिवाय दोन वेळा प्रमुख स्पर्धांच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली...असो !

2012 मध्ये ‘युरो’ जिंकल्यानंतर स्पेनच्या संघानं नेहमीच त्यांच्या प्रतिभेवर सातत्यानं अन्याय केला असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे गोल करण्यापेक्षा चेंडूवर जास्तीत जास्त ताबा मिळविण्याचं वेड...जर्मनीत मात्र स्पेननं नवीन हत्याराचा वापर केला नि प्रतिस्पर्ध्यांवर बचावासाठी अक्ष्रश: मैदानात पळण्याचा प्रसंग आणला...अजूनही त्या जुन्या शैलीचं दर्शन कित्येक वेळा घडलेलं असलं, तरी ते राष्ट्र बदलतंय एवढं मात्र खरं. कारण ‘विंग्स’ हा स्पॅनिश संघाचा मजबूत पैलू बनलाय !

यामालची कमाल...

कोण हा लमिन यमाल ?...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article