जर्मनीला हरवून स्पेन अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ बोलॉन (इटली)
2025 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत स्पेनने जर्मनीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता स्पेन आणि इटली यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत स्पेनने जर्मनीचा 2-1 असा पराभव केला. स्पेनने आतापर्यंत 6 वेळेला डेव्हिस चषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. जर्मनी आणि स्पेन यांच्यातील झालेल्या उपांत्य लढतीत दुहेरीच्या सामन्यात स्पेनच्या ग्रेनोलर्स आणि मार्टिनेस यांनी जर्मनीच्या क्रेव्हेझ आणि टीम पझ यांचा 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत जर्मनीचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. या लढतीमध्ये स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझ सहभागी झाला नव्हता. त्याच्या गैरहजेरीत या स्पर्धेसाठी स्पेनचे नेतृत्व डेव्हिड फेररकडे सोपविण्यात आले होते. पहिल्या एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या बुस्टाने जर्मनीच्या स्ट्रफचा 6-4, 7-6 (8-6) असा पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने स्पेनच्या मुनारचा 7-6 (7-2), 7-6 (7-5) असा पराभव करत स्पेनशी बरोबरी साधली. पण दुहेरीच्या सामन्यात जर्मनीला हार पत्करावी लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. हा दुहेरीचा सामना 100 मिनिटे चालला होता. 2000 नंतर स्पेनला या स्पर्धेचे विजेतेपद मिळविता आलेले नाही. राफेल नदालच्या निवृत्तीनंतर स्पेनला यावेळी जेतेपद मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे.