स्पेनला युरो चषक, इंग्लंडवर 2-1 ने मात
वृत्तसंस्था/ बर्लिन
स्पेन हा विक्रमी चौथ्यांदा युरोपियन फुटबॉलचा राजा बनला आहे, तर दुसरीकडे, इंग्लंडसाठी अनेक दशकांहून अधिक काळ चाललेल्या कथेतील हा आणखी एक वेदनादायक अंक राहिला आहे. पुन्हा एकदा त्यांना जेतेपदाच्या अत्यंत जवळ पोहोचूनही किताबाने हुलकावणी दिलेली आहे. स्पॅनिश संघाने सुऊवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखलेली स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करताना रविवारी युरोपियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 86 व्या मिनिटाला मिकेल ओयारझाबल याने केलेल्या गोलाच्या जोरावर इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला.
कर्णधार अल्वारो मोराटाला बदली खेळाडू म्हणून आलेला बॅकअप स्ट्रायकर ओयारझाबालने मार्क कुकुरेलाने दिलेल्या क्रॉस पासवर हा गोल नोंदविला. बर्लिनच्या ऑलिम्पिया स्टेडियममधील हा सामना अतिरिक्त वेळेमध्ये जाणार हे निश्चित असल्याचे वाटत असतानाच हा गोल झाला आणि स्पेनने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
फुटबॉलचे जन्मस्थान असलेल्या इंग्लंडने 1966 चा विश्वचषक जिंकल्यापासून पुऊषांच्या खेळात अजूनही मोठे विजेतेपद मिळवलेले नाही आणि मोराटा 1936 च्या ऑलिम्पिकसाठी तयार केलेल्या स्टेडियममध्ये आतषबाजीच्या पार्श्वभूमीवर रूपेरी चषक उंचावत असताना ते हताश होऊन पाहण्याचा प्रसंग इंग्लंडच्या खेळाडूवर आला.
1964, 2008 आणि 2012 मध्ये स्पेनने जिंकलेल्या विजेतेपदांमध्ये यंदाच्या जेतेपदाची भर पडली आहे. आम्ही युरोपचे चॅम्पियन आहोत, असे निको विल्यम्स म्हणाला. त्यानेच स्पेनसाठी 47 व्या मिनिटाला सलामीचा गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण इंग्लंडच्या कोल पामरने 73 व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधून दिली. ’आम्ही रोमांचित आहोत आणि आशा आहे की हे असेच चालू राहील आणि आम्ही 2026 चा विश्वचषकही जिंकू शकू’, असे विल्यम्स नंतर म्हणाला. लॅमिन यामालने विल्यम्सच्या या गोलसाठी पाया घालून दिला.
2023 मध्ये इंग्लंडविऊद्धच अंतिम सामना जिंकून महिला विश्वचषक आणि पुऊषांची यूएफा नेशन्स लीग असे दोन्ही किताब जिंकलेला स्पेन वरिष्ठ फुटबॉलमधील प्रमुख नाव म्हणून पुन्हा उदयाला आले आहे. 2001 पासून स्पॅनिश पुऊष संघांनी क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये 23 प्रमुख फायनल जिंकल्या आहेत.
दरम्यान, स्पेनचा लॅमिने यामालला युरो 2024 यंग प्लेअर ऑफ दि टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले, तर रॉद्री या आणखी एका स्पॅनिश खेळाडूला युरो 2024 चा स्पर्धावीर पुरस्कार प्राप्त झाला.