अवकाशप्रेमींनी पाहिला चंद्रग्रहणाचा नजारा
बेळगाव : चालू वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण देशातील अवकाशप्रेमींनी रविवारी रात्री अनुभवले. रात्री 9:56 वाजता सुरू झालेले चंद्रग्रहण तब्बल साडेतीन तास सुरू होते. यापैकी 82 मिनिटे पूर्ण चंद्रग्रहण होते. या कालावधीत अवकाशप्रेमींनी त्याचे विविध नजारे आपल्या मोबाईल, कॅमेरे आणि दुर्बिणीमध्ये कैद केले. रविवारी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेकांना हे ग्रहण पाहण्याचा आनंद लुटता आला. हे पूर्ण ग्रहण म्हणजेच ‘ब्लड मून’ असल्यामुळे ते देशाच्या विविध भागातून पाहता आले. 2022 नंतर भारतात दिसणारे हे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण असल्यामुळे या ग्रहणाकडे खगोलप्रेमींचे डोळे लागलेल होते. या दरम्यान, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यामुळे त्याची सावली चंद्रावर पडताच चंद्र लाल-केशरी रंगामध्ये दिसू लागला. त्यानंतर चंद्राचा आकार बदलत गेल्याने खगोलप्रेमी आनंदित झाले. यापूर्वी 27 जुलै 2018 नंतर पहिल्यांदाच देशाच्या सर्व भागांमधून ग्रहण दिसले होते. आताचे चंद्रग्रहण भारत, आशिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि युरोपसह जगातील अनेक भागात दिसले. आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक वेळ आणि सर्वोत्तम चंद्रग्रहण दिसले.