सप नेता नबाव सिंहच्या अडचणी वाढल्या
डीएनए चाचणीत बलात्काराची पुष्टी
वृत्तसंस्था/ कनौज
उत्तरप्रदेशातील कनौज येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी सप नेते नवाब सिंह यादवच्या अडचणी वाढल्या आहेत. नवाब सिंह आणि बलात्कार पीडितेची डीएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर मुलीवर नवाब सिंहनेच बलात्कार केला होता याची पुष्टी मिळाली आहे. या चाचणीचा अहवाल पोलिसांना मिळाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी दिली आहे. या अहवालामुळे नवाबच्या अडचणी आता वाढल्या आहेत.
12 ऑगस्ट रोजी कनौजच्या नसरापूर येथील महाविद्यालयातून अल्पवयीन मुलीनी केलेलया तक्रारीनंतर पोलिसांनी नवाबसिंहला आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. याप्रकरणी अल्पवयीन पीडितेचा वैद्यकीय अहवाल आणि पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवत नवाबसिंहची तुरुंगात रवानगी केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे नवाबची डीएनए चाचणी करविण्याची अनुमती मागितली होती. न्यायालयाची अनुमती आणि नवाबच्या सहमतीने 18 ऑगस्ट रोजी वैद्यकीय पथकाने तुरुंगातून नवाबचा डीएनए नमुना मिळविला होता. तसेच अल्पवयीन पीडितेचे नमुनेही तपासणीसाठी एफएसएल आग्रा येथे पाठविण्यात आले होते. सोमवारी या चाचणीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. या अहवालामुळे नवाबने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता असे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी नवाबकडे अल्पवयीन मुलीला तिच्या आत्यानेच नेल्याचेही स्पष्ट झाले. अल्पवयीन मुलीचा जबाब आणि तिच्या आईवडिलांनी केलेल्या आरोपांच्या आधारावर तिच्या आत्याला आरोपी करण्यात आले आहे. तिला देखील अटक करण्यात आली आहे. या महिला आरोपीने चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे पेले आहेत.