विकास दर 6.5 टक्के राहणार एस अँड पी ग्लोबलचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.5 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज नुकताच एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज यांनी व्यक्त केला आहे. आपल्या आधीच्या अंदाजात एजन्सीने सुधारणा केली आहे.
जागतिक अस्थिर स्थितीच्या पार्श्वभूमीवर एस अँड पीने यापूर्वी भारताचा विकास दर आर्थिक वर्षात 6.3 टक्के इतका अंदाज व्यक्त केला होता. एजन्सीच्या मते आता भारतात मागणीत वाढ दर्शवली गेली असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक आव्हानांच्या तुलनेत चांगली घोडदौड करत आहे, असे एजन्सीने म्हटले आहे.
जीडीपी दरात वाढ करण्यामागे एजन्सीने अनेक कारणे सांगितली आहेत. यात सामान्य मान्सून होण्याची शक्यता, कच्च्या तेलाच्या किमतीत घट, प्राप्तीकर सवलतीचा लाभ व व्याजदरात होणारी घट ही कारणे दिली गेली आहेत. याआधी भारताचा विकास दर 6.5 टक्के इतका असणार असल्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनेही व्यक्त केला होता. जागतिक स्तरावर वाढता भूराजकीय तणाव आर्थिक विकासाला खो घालू शकतो, असे एस अँड पीने म्हटले आहे. इराण व इस्राइल यांच्यातील संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने परिस्थिती तणावाची झाली आहे. जर का यामुळे कच्च्या तेलाच्या किमती उच्च स्तरावर दीर्घकाळ राहिल्या तर याचा परिणाम भारतासारख्या देशावर होऊ शकतो.