सपकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर
मिल्कीपूरमध्ये अजित प्रसाद यांना उमेदवारी
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशच्या 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने कंबर कसली आहे. सपने बुधवारी 6 मतदारसंघांमधील स्वत:चे उमेदवार जाहीर केले आहेत. करहल मतदारसंघात तेजप्रताप यादव आणि सीसामऊ येथे नसीम सोलंकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फुलपूरमध्ये मुस्तफा सिद्दीकी आणि मिल्कीपूर येथे अजित प्रसाद हे सपचे उमेदवार असतील.
कटेहरी मतदारसंघात शोभावती वर्मा आणि मझंवा येथे डॉ. ज्योति बिंद यांना सपने उमेदवारी दिली आहे. अजित प्रसाद हे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र आहेत. नसीम सोलंकी या सीसामऊचे माजी आमदार इरफान सोलंकी यांच्या पत्नी आहेत. इरफान सोलंकी सध्या तुरुंगात आहेत.
फैजाबादमधील मिल्कीपूर मतदारसंघ हा अवधेश प्रसाद हे खासदार म्हणून निवडून आल्याने रिक्त आहे. आता या मतदारसंघात सपने अवधेश प्रसाद यांच्या पुत्राला संधी दिली आहे. तर मैनपुरीचा करहल हा मतदारसंघ अखिलेश यादव खासदार म्हणून निवडून आल्याने रिक्त झाला आहे. तेजप्रताप हे करहल विधानसभा मतदारसंघात विजयी झाले तर मुलायम सिंह यादव परिवारातील ते 8 वे सदस्य ठरणार आहेत, जे कुठल्या न कुठल्या सभागृहाचे सदस्य असतील. लोकसभेत अखिलेश यादव, डिंपल यादव, धर्मेंद्र यादव, अक्षय यादव, आदित्य यादव, राज्यसभेत रामगोपाल यादव आणि उत्तरप्रदेश विधानसभेत शिवपाल यादव हे यापूर्वीच सदस्य आहेत.
आंबेडकर नगरचा कटहरी विधानसभा मतदारसंघ हा लालजी वर्मा हे खासदार म्हणून निवडून आल्याने रिक्त आहे. या मतदारसंघात लालजी वर्मा यांच्या पत्नी सुभावती वर्मा यांना सपने उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कानपूरचा सीसामऊ मतदारसंघ हा आमदार इरफान सोलंकी यांना 7 वर्षांची शिक्षा झाल्याने रिक्त झाला आहे. सपने इरफान सोलंकी यांच्या पत्नी नसीम यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे.
मिर्झापूर जिल्ह्यातील मंझवा मतदारसंघात भदोहीचे माजी खासदार रमेश बिंद यांच्या कन्या डॉ. ज्योति बिंद यांना उमेदवारी देण्यात आली. रमेश बिंद हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम ठोकून सपमध्ये दाखल झाले होते. सपने त्यांना मिर्झापूर मतदारसंघात उमेदवारी दिली होती, परंतु ते पराभूत झाले होते. दुसरीकडे फुलपूरमध्ये सपने मुस्तफा सिद्दीकी यांना तिकीट दिले आहे. तेथे भाजप खासदार प्रवीण पटेल हे खासदार म्हणून निवडून आल्याने पोटनिवडणूक होणार आहे.