दक्षिण कोरियन हान कांग यांना साहित्याचे नोबेल
मानवी जीवनातील विघटन आणि आघात कथांमध्ये विणल्याबद्दल सन्मानित
वृत्तसंस्था/स्टॉकहोम
दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना 2024 चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या प्रगल्भ काव्यात्मक गद्यासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ऐतिहासिक आघातांचा सामना करणाऱ्या आणि मानवी जीवनाच्या नाजूकपणावर प्रकाश टाकणाऱ्या त्यांच्या सखोल काव्यात्मक गद्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक स्वीडिश अकादमीद्वारे दिले जाते. त्याचे मूल्य 11 दशलक्ष स्वीडिश क्राऊन (1.1 दशलक्ष डॉलर्स) आहे.
नोबेल पुरस्कार विजेत्या हान कांग यांचा जन्म 1970 साली दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झाला. त्या 9 वर्षाच्या असताना त्यांचे कुटुंब सोल येथे गेले. त्यांचे वडीलही प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. हान कांग यांनी आपल्या लेखनासोबतच कला आणि संगीतातही स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या कथा, गद्य मानवी जीवनातील नाजूकपणा अधोरेखित करतात. त्यांच्या पुस्तकांमध्ये द व्हेजिटेरियन, द व्हाईट बुक, ह्युमन अॅक्ट्स आणि ग्रीक लेसन यांचा समावेश आहे.
हान कांग यांनी 1993 मध्ये मुन्हाक-ग्वा-साहो (साहित्य आणि समाज) च्या हिवाळी अंकात ‘विंटर इन सोल’ यासह पाच कविता प्रकाशित करून कवी म्हणून पदार्पण केले. त्यानंतर दुसऱ्याचवर्षी एक कादंबरीकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुऊवात केली. 1994 मध्ये ‘रेड अँकर’सह सोल शिनमुन स्प्रिंग साहित्यिक स्पर्धा जिंकली. त्यांनी 1995 मध्ये येओसू (मुंजी प्रकाशन कंपनी) नावाचा त्यांचा पहिला लघुकथा संग्रह प्रकाशित केला. 1998 मध्ये आर्ट्स कौन्सिल कोरियाच्या पाठिंब्याने तीन महिने आयोवा आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या.
दर्जेदार साहित्य
हान कांग यांच्या प्रकाशनांमध्ये फ्रूट्स ऑफ माय वुमन (2000) या लघुकथा संग्रहाचा समावेश आहे. तसेच फायर सॅलॅमंडर (2012), ब्लॅक डीयर (1998), युवर कोल्ड हँड्स (2002), द व्हेजिटेरियन (2007), ब्र्रेथ फायटिंग (2010), ग्रीक लेसन्स (2011), ह्युमन अॅक्ट्स (2014), द व्हाईट बुक (2016), आय डू नॉट बिड फेअरवेल (2021) अशा दर्जेदार साहित्यसंपदेचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ‘आय पुट द इव्हनिंग इन द ड्रॉवर’ (2013) हा कवितासंग्रहही प्रकाशित झाला आहे. हान कांग यांची सर्वात अलीकडील कादंबरी ‘आय डू नॉट बिड फेअरवेल’ ला 2023 मध्ये फ्रान्समधील मेडिसिस पारितोषिक आणि 2024 मध्ये एमिल गुईमेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.