दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांवर प्रवासबंदी
मार्शल लॉ लागू झाल्याने निर्बंध : विरोधक पुन्हा महाभियोग प्रस्तावाच्या तयारीत
वृत्तसंस्था/ सेऊल
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांच्यावर सोमवारी प्रवासबंदी घालण्यात आली. मार्शल लॉ लागू केल्यामुळे राष्ट्रपतींवर हे निर्बंध घालण्यात आल्याचे दक्षिण कोरियाच्या भ्रष्टाचाराच्या तपास प्रमुखाने सांगितले. गेल्या आठवड्यापासून मार्शल लॉ लागू झाल्यामुळे दक्षिण कोरियाचे पोलीस त्याच्याविरुद्ध बंडखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी प्रवास बंदीचा विचार करत होते.
गेल्या मंगळवारी यून सुक-येओल यांनी विरोधी पक्षाने उत्तर कोरियाशी संगनमत केल्याचा आणि देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप केल्यानंतर देशात मार्शल लॉ लागू केला. यानंतर देशात गंभीर राजकीय अशांततेचा सामना करावा लागला. विरोधकांनी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला होता, तो मंजूर होऊ शकला नाही. सत्ताधारी पक्षाच्या बहुतांश खासदारांनी महाभियोग प्रस्तावावर मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे विरोधकांना तो मंजूर करण्यासाठी आवश्यक 200 मते मिळवता आली नाहीत. मात्र, बुधवारपासून दक्षिण कोरियात संसदेचे नवीन अधिवेशन सुरू होत आहे. अशा परिस्थितीत विरोधक पुन्हा एकदा महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहेत. बुधवारी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात विरोधकांना यश आले, तर युन यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जाण्याचे संकेत मिळत आहेत.