दक्षिण अयोध्या अवतरली, भाजप सुखावला
दरोड्यांच्या खळबळीतून ‘इफ्फी’च्या चंदेरी माहोलाकडे वळलेला गोवा, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी, मोदी’च्या घोषणांनीही दुमदुमून गेला. गोव्यात दक्षिण अयोध्या अवतरली. अयोध्या, जय श्रीराम आणि मोदी मोदीच्या घोषणांनी जिल्हा पंचायतांच्या निवडणुकांकडे वळताना भाजपवाले सुखावले असतील, यात शंका नाही. जिल्हा पंचायतीच्या निमित्ताने राजकारण गतीमान झालेले आहे. येत्या 20 रोजी 50 जणांना बिनकामाची आणि कुणाच्याच फायद्याची नसलेली जिल्हा पंचायत सदस्यपदाची लॉटरी लागणार आहे.....
गोव्याला आता दरोडे काही नवीन राहिलेले नाहीत. दरोडेखोरांचा मोर्चा अधूनमधून गोव्याकडे वळतच असतो. बऱ्याच पूर्वी अगदी मनोहर पर्रीकरांच्या काळातही एकावर एक अशा पध्दतीने अनेक बंगल्यावर दरोडे पडले होते. दरोडेखोरांचे हे जुने धैर्य हल्ली पुन्हा खळबळ उडवू लागले आहे. एरव्ही, दरोडेखोर बंगल्यांनाच लक्ष्य करतात. वास्कोत मात्र थोडे वेगळे घडले. दरोडेखोरांनी भल्या मोठ्या इमारतीतील, सहाव्या मजल्यावरील एकमेव फ्लॅट निवडला आणि आपले लक्ष्य साध्यही केले. कधी माजली नव्हती एवढी खळबळ या दरोड्याने गोव्यात माजविली. दरोडेखोर आल्या पावली खुशाल निघून गेले. नशीब, हे दरोडेखोर आठ दिवसांत गजाआड झाले व लुटलेला ऐवज हस्तगत झाला.
गुन्हेगारी रोखण्यात गोव्याचे पोलीस कमी पडतात, हे सत्यच आहे. गोवा बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनीही आता बदलायला हवे. गुन्हेगारांना परराज्यात जाऊन पकडून आणण्यासाठी कष्ट घेण्यापेक्षा गुन्हेगारीला आळा घालण्यावर शक्ती आणि युक्ती वापरायला हवी. हवे-हवे ते तंत्रज्ञानही आता उपलब्ध आहे. एखादा गुन्हा घडलाच तर तो गुन्हेगार गोव्यातून निसटणार नाही, यासाठी सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहावे लागेल. रात्री एक ते पहाटे चार ही चोरांची आणि दरोडेखोरांची ठेवणीतली वेळ असते. तीन ते चार तास वैऱ्यांचे समजून कायद्याच्या रक्षकांनी आणि समाजाने नियमित खबरदारी घेतल्यास चोऱ्या दरोड्यांना बऱ्याच प्रमाणात आळा बसू शकतो, हे पोलिसांनाही माहीत असेलच.
गोवा हे पर्यटन राज्य आहे. सबंध देशातील आणि विदेशातील नागरिक गोव्यात लाखोंच्या संख्येने प्रवेश करतात. काही चांगल्या उद्देशाने तर काही गैरउद्देशाने येतात. गोव्यात येऊन काहीही करता येते. गोव्याचा हवा तसा वापर करता येतो. एखाद्या मालमत्तेवर डल्ला मारून निसटता येते, अशी मानसिकता गोमंतकीयांसाठी भविष्यात धोका निर्माण करू शकते. गोव्यात कोण येतात आणि कोण जातात, याचा बऱ्याचवेळा आपल्या यंत्रणेला थांगपत्ता नसतो. रात्रीची पोलीस गस्त आणि पोलिसांची गुप्त यंत्रणा प्रभावी नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आपल्या पोलीस खात्याने मनावर घेतल्यास काहीही कठीण नाही. त्यांनी कात टाकायला हवी. गोवा राज्यात परप्रांतीय गुन्हेगार निर्ढावले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर चोऱ्या, दरोडे, अपहरणे, वाटमारीसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान उभे राहणार आहे. घरचे गुन्हेगारही शांततेला गालबोट लावत असतात. खंडणीखोर आणि सुपारीखोर इथेही आढळून येतात. त्यांना ठेचण्याचे कष्ट पोलिसांनी घ्यावे. स्थानिक राजकीय नेत्यांनीही पोलिसांना पाठबळ द्यावे.
दरोडेखोरी, चोऱ्या-माऱ्या घडल्या की, सरळ पोलिसांच्या माथी खापर फोडावे, ही सार्वत्रिक पद्धतच होऊन गेलेली आहे. आपली घरे-दारे, बँका, उद्योग-व्यवसाय, शाळा, महाविद्यालये असे सर्व काही पोलिसांनीच सांभाळायला हवे, हा अट्टहास चुकीचा आहे. प्रत्येक बंगला किंवा प्रत्येक फ्लॅटला सुरक्षा पुरविणे पोलिसांना शक्य होणार नाही. कायद्याच्या रक्षकांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच जबाबदारी नागरिकांचीही आहे. कोटी-कोटींची मालमत्ता जमविणाऱ्यांना त्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी टाळता येणार नाही. तसा सर्वसामान्य गोमंतकीयसुध्दा अद्याप म्हणावा तेवढा जागरूक नाही. भाडेकरूंची तपासणी त्यांना कटकटीची वाटते. उद्योग-व्यवसाय करणारेही आपल्या कामगारांची फारशी पडताळणी करीत नाहीत. त्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत राहतात. अशा लोकांना पोलिसांनी कायद्यानेच वठणीवर आणणे योग्य ठरणार आहे.
बंदर शहरातील दरोडेखोरीचा छडा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीच लागला आणि क्षणात माहोल बदलला, हे सरकारसाठी फार बरे झाले. गोव्यातल्या दक्षिण टोकावर प्रभू श्रीरामांचा 77 फूट उंच पुतळा उभा राहिला. हे श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचेच भूषण नाही तर गोव्यासाठीही अप्रुपाची गोष्ट. सार्ध पंचशताब्दीच्यानिमित्ताने गोवा पुन्हा एकदा राममय झाला. तो काही भाजपचा मेळावा नव्हता. तरीही ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी, मोदी’ ही भावना मठाच्या अनुयायींना आवरता आली नाही आणि पंतप्रधानांचा गौरव करताना प. पू. विद्याधीशतीर्थ स्वामींनी शब्द कमी पडू दिले नाहीत. पंतप्रधान नरेंद मोदी भगवान श्रीकृष्णासारखे, ते धर्मपुत्र, भारताला लाभलेला हिरा, अशी उपमा म्हणजे काही नरेंद्र मोदींची भलावण नव्हती. ती मोदींप्रतिची उत्स्फूर्त भावना होती.
प. पू. स्वामींची भावना म्हणजेच श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाची भावना. राजकीय पातळीवर कुणी काय समजायचे, ते समजून घेतीलच. पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात, मठाच्या अनुयायींना नऊ सूत्रांचे पालन करण्याचा उपदेश केला. त्या सूत्रांचे पालन झाले तर समाजाचे कल्याण होण्यास वेळ लागणार नाही.
पंतप्रधानांचे गोव्यात आगमन झाले, ते सुध्दा जिल्हा पंचायतीच्या निवडणुका उंबरठ्यावर असताना. हे भाजपवाल्यांना सुखावणारेच होते. ‘इफ्फी’च्या माहोलातून आणि दरोड्यांच्या चिंतेतून बाहेर पडलेले राज्याचे मुख्यमंत्री, आता जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी कंबर कसणार आहेत. जिल्हा पंचायतींना गोव्यात कसलेच विशेष स्थान नाही. सदस्यांना अधिकारही नाहीत. तरीही राजकीय वर्चस्व सिध्द करण्यासाठी सारी धडपड होणार आहे. गोव्यातील यंदाची ही सहावी जिल्हा पंचायत निवडणूक आहे. 8 लाख 68 हजार 637 मतदार दोन जिल्हा पंचायतींसाठी मतदान करणार आहेत. वर्षातील बाराही महिने निवडणुकीच्याच ‘मूड’मध्ये राहणाऱ्या भाजपसमोर 2027च्या विधानसभेचे लक्ष्य ठेवून आव्हान उभे करण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, पाहावे लागेल.
अनिलकुमार शिंदे