द.आफ्रिकेचा बांगलादेशवर विजय
वृत्तसंस्था / विशाखापट्टणम
आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा तीन चेंडू बाकी ठेवून तीन गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा तिसरा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रायोनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. सोमवारच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 232 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 49.3 षटकात 7 बाद 235 धावा जमवित निसटता विजय मिळविला.
बांगलादेशच्या डावात शर्मिन अख्तर आणि शोरना अख्तर यांनी अर्धशतके झळकविली. शर्मिनने 77 चेंडूत 6 चौकारांसह 50 तर शोरना अख्तरने 35 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 51 धावा झोडपल्या. सलामीच्या फर्गेना हकने 76 चेंडूत 3 चौकारांसह 30, रुबिया हैदरने 2 चौकारांसह 25 तसेच कर्णधार निगार सुलतानाने 42 चेंडूत 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. रिटू मुनीने 3 चौकारांसह नाबाद 19 धावा केल्या. निगर सुलताना आणि शर्मिन अख्तर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 77 धावांची भागिदारी केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे मलाबाने 2 तर ट्रायोन आणि डी क्लर्क यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द.आफ्रिकेच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. दुसऱ्याच षटकात सलामीची ब्रिट्स खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाली. त्यानंतर कर्णधार वूलव्हर्ट आणि बॉश्च यांनी दुसऱ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर द.आफ्रिकेचा निम्मा संघ 22 षटकात 78 धावांत तंबूत परतला होता. पण कॅप आणि ट्रायोन या जोडीने सहाव्या गड्यासाठी 85 धावांची भागिदारी केली. कॅपने 71 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 56 तर ट्रायोनने 69 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 62 धावा जमविल्या. 45 व्या षटकात ट्रायोन सातव्या गड्याच्या रुपात बाद झाली त्यानंतर डी क्लर्क आणि क्लास या जोडीने शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. डी. क्लर्कने 29 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 37 तर क्लासने 1 चौकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे नाहीदा अख्तरने 2 तर रबिया खान, खातुन, मोनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 50 षटकात 6 बाद 232 (शोरना अख्तर नाबाद 51, शमीम अख्तर 50, फर्गेना हक 30, रुबिया हैदर 25, निगार सुलताना 32, मोनी नाबाद 19, अवांतर 16, मलाबा 2-42, डी. क्लर्क आणि ट्रायोन प्रत्येकी 1 बळी), द.आफ्रिका 49.3 षटकात 7 बाद 235 (ट्रायोन 62, कॅप 56, डी. क्लर्क नाबाद 37, बॉश्च 28, वूलव्हर्ट 31, क्लास नाबाद 10, नाहीदा अख्तर 2-44, रबिया खान, खातुन मोनी प्रत्येकी 1 बळी)