द.आफ्रिकेचा भारतावर थरारक विजय
सामनावीर नदीन डी.क्लर्कची अष्टपैलू खेळी, वुलव्हर्टचे अर्धशतक, रिचा घोषची खेळी वाया
वृत्तसंस्था/विशाखापट्टणम
डी क्लर्क, कर्णधार वूलव्हर्ट आणि ट्रायोन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर गुरूवारी येथे झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रंगतदार सामन्यात द.आफ्रिकेने यजमान भारताचा 7 चेंडू बाकी ठेवून 3 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील द.आफ्रिकेचा हा सलग दुसरा विजय आहे. तर भारताने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून एक सामना गमविला आहे. या सामन्यात रिचा घोषची 94 धावांची खेळी वाया गेली. स्पर्धेतील या दहाव्या सामन्यात द.आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताचा डाव 49.5 षटकात 251 धावांत आटोपला. त्यानंतर द.आफ्रिकेने 48.5 षटकात 7 बाद 252 धावा जमवित विजय नोंदविला. भारताच्या डावामध्ये यष्टीरक्षक आणि फलंदाज रिचा घोषने 77 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 94 धावा झळकविताना स्नेह राणा समवेत आठव्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केल्याने भारताला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला. त
त्पूर्वी सलामीच्या प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने 10.2 षटकात 55 धावांची भागिदारी केली. रावलने 56 चेंडूत 5 चौकारांसह 37 तर मानधनाने 32 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 23 धावा जमविल्या. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी दगा दिल्याने भारताची एकवेळ स्थिती 26 षटकात 6 बाद 102 अशी केविलवाणी होती. देवोलने 1 चौकारासह 13, कर्णधार हरमनप्रित कौरने 9 धावा जमविल्या. रॉड्रिग्जला खातेही उघडता आले नाही. दिप्ती शर्मा 4 धावांवर तर अमनज्योत कौर 1 चौकारासह 13 धावांवर बाद झाल्या. त्यानंतर मात्र रिचा घोष, स्नेह राणा यांनी संघाला सुस्थितीत नेले. स्नेह राणाने 24 चेंडूत 6 चौकारांसह 33 धावा जमविल्या. रिचा घोषचे वनडे क्रिकेटमधील हे सातवे अर्धशतक आहे. भारताने 55 धावांची सलामी दिल्यानंतर त्यांचे 5 गडी 47 धावांत बाद झाले. द.आफ्रिकेतर्फे ट्रायोनने 32 धावांत 3 तर कॅप, डी. क्लर्क आणि मलाबा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सेखुखुनेने 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द.आफ्रिकेच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. डावातील तिसऱ्याच षटकात सलामीच्या ब्रिट्सला क्रांती गौडने स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपले. ब्रिट्सला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर अमनज्योत कौरने सुने लूसला 5 धावांवर झेलबाद केले. कॅपने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. स्नेह राणाने तिचा त्रिफळा उडविला. दिप्ती शर्माने स्वत:च्याच गोलंदाजीवर बॉशला झेलबाद केले. तर श्री चरणीने जाफ्टाला पायचीत केले. तिने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. द.आफ्रिकेची यावेळी स्थिती 19.4 षटकात 5 बाद 81 अशी केविलवाणी होती. कर्णधार वूलव्हर्ट आणि ट्रायोन या जोडीने सहाव्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. क्रांती गौडने वूलव्हर्टचा त्रिफळा उडविला. तिने 111 चेंडूत 8 चौकारांसह 70 धावा जमविल्या. वूलव्हर्ट बाद झाल्यानंतर ट्रायोन आणि डी. क्लर्क या जोडीने सातव्या गड्यासाठी 69 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. राणाने ट्रायोनला पायचीत केले. तिने 5 चौकारांसह 49 धावा झळकविल्या. डी. क्लर्कने खाकाच्या साथीने आपल्या संघाला दमदार विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
भारत 49.5 षटकात सर्वबाद 251 (घोष 94, स्नेह राणा 33, रावल 37, मानधना 23, देवोल 13, अमनज्योत कौर 13, अवांतर 25, ट्रायोन 3-32, कॅप, डी. क्लर्क आणि मलाबा प्रत्येकी 2 बळी), द.आफ्रिका 48.5 षटकात 7 बाद 252 (डी. क्लर्क नाबाद 84, वूलव्हर्ट 70, ट्रायोन 49, कॅप 20, जाफ्टा 14, गौड, स्नेह राणा प्रत्येकी 2 बळी, अमनज्योत कौर, श्री चरणी व दिप्ती शर्मा प्रत्येकी 1 बळी)