ऑस्ट्रेलियन महिलांसमोर आज दक्षिण आफ्रिकेचा धोका
वृत्तसंस्था/ इंदूर
महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात आज ऑस्ट्रेलियाची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार असून ऑस्ट्रेलिया त्यांची ‘थ्री-इन-वन’ कर्णधार एलिसा हिली तंदुऊस्त होईल आणि या सामन्यात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असेल, अशी आशा असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाचे प्रबळ दावेदार ठरताना उल्लेखनीय लवचिकता आणि धैर्य दाखवले आहे.
कर्णधार, सलामीवीर आणि यष्टीरक्षक अशी तिहेरी भूमिका बजावणाऱ्या हिलीला बुधवारी इंग्लंडविऊद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना पोटरीला दुखापत झाली होती. त्यामुळे सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व ताहलिया मॅकग्राला करावे लागले होते. मॅकग्राने आपल्या नेतृत्वाखाली संघाला कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर मोठा विजय मिळवून दिला. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून 10 गडी राखून झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेने सलग पाच सामने जिंकून मोठी कामगिरी करण्याचा इरादा दाखवला आहे. त्यामुळे 35 वर्षीय हिलीची तंदुऊस्ती दक्षिण आफ्रिकेच्या धोक्याचा सामना करण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची बनते. कारण ती स्पर्धेत फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करत आलेली आहे.
भारत आणि बांगलादेशविऊद्ध सलग दोन शतके झळकावलेली हिली सध्याच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताच्या स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडविऊद्ध हिलीच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाला फलंदाजी क्रमात बरीच तडजोड करावी लागली, तरीही संघाने सहज विजय मिळवला. अॅनाबेल सदरलँड आणि अॅश्ले गार्डनर यांनी स्वत:ला क्रमवारीत खाली ढकलले आणि नाबाद 180 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीतील खोलीला त्यांच्याकडील वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा विभाग पूरक असल्याने तो पराभूत करण्यास कठीण असा संघ बनलेला आहे आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घोडदौडीला रोखण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल.
इंग्लंडविऊद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या लढाऊ गुणांची झलक दिसून आली. फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वोल, एलिस पेरी आणि बेथ मुनी या अव्वल चार फलंदाजांना स्वस्तात गमावूनही संघाने त्यांच्या अनुभवाचा सखोल वापर केला आणि सदरलँड आणि गार्डनर यांनी अनुक्रमे नाबाद 98 आणि 104 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीतील प्रचंड खोलीची जाणीव असेल आणि ती वेगवान गोलंदाज मॅरिझान कॅपवर अवलंबून असेल. संयमी सुऊवात केल्यानंतर कॅपने सहा बळी मिळवून आणि दोन अर्धशतके झळकावून अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत सहज प्रवेश केला आहे. परंतु सलामीवीर वोल्वार्ड, टॅझमिन ब्रिट्स आणि वरच्या फळीतील फलंदाज सून लुस या त्रिकुटाला आज भरपूर धावा कराव्या लागतील. कारण दक्षिण आफ्रिकेकडे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांइतकी फलंदाजीची खोली नाही.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.