डेव्हॉन कॉन्वे, मिचेल हे यांची अर्धशतके
न्यूझीलंडला 73 धावांची आघाडी, फिलिपचे 3 बळी, विंडीज दु. डाव 2 बाद 32
वृत्तसंस्था/वेलिंग्टन
कसोटी पदार्पणातील पहिल्याच डावात अर्धशतक झळकविणारा मिचेल हे आणि कॉन्वे यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने विंडीजवर दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 73 धावांची आघाडी मिळविली. दिवसअखेर विंडीजने दुसऱ्या डावात 2 बाद 32 धावा जमविल्या.
या कसोटी सामन्यात विंडीजचा पहिला डाव 205 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने बिनबाद 24 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. विंडीजच्या रॉचने कर्णधार लॅथमचा 11 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर कॉन्वे आणि विलियमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. उपाहारापूर्वी विंडीजच्या फिलीपने विलियमसनचा त्रिफळा उडविला. त्याने 7 चौकारांसह 37 धावा जमविल्या. खेळाच्या पहिल्या सत्राअखेर न्यूझीलंडने 34 षटकांत 2 बाद 112 धावा जमविल्या होत्या. दरम्यान कॉन्वेने आपले अर्धशतक 87 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने झळकविले.
उपाहारानंतर विंडीजच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या मधल्या फळीला लवकर बाद केले. रॉचने रचिन रविंद्रला केवळ 5 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर ग्रिव्ह्जने कॉन्वेला इमालेचकरवी झेलबाद केले. कॉन्वेने 108 चेंडूत 8 चौकारांसह 60 धावा जमविल्या. फिलीपने मिचेलला बाद करुन न्यूझीलंडवर चांगलेच दडपण आणले. मिचेलने 52 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 25 धावा जमविल्या. न्यूझीलंडचा निम्मा संघ 190 धावांत बाद झाला होता. मिचेल आणि हे यांनी पाचव्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केल्याने न्यूझीलंडला 278 धावांपर्यंत मजल मारता आली. चहापानावेळी न्यूझीलंडने 57 षटकांत 5 बाद 200 धावा जमविल्या होत्या. कसोटी पदार्पण करणाऱ्या मिचेल हे ने 74 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि शिल्ड्सने मिचेल हे ला रॉचकरवी झेलबाद केले. त्याने 93 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 61 धावा जमविल्या. फिलिप्सने 27 चेंडूत 1 षटकारासह 18 तर डफीने 13 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. मिचेल रेने 11 चेंडूत 1 चौकारांसह 13 धावा केल्या. टिकनेर दुखापतीमुळे फलंदाजी करु शकला नाही. होकेसने 43 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 23 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 74.4 षटकांत 278 धावांवर आटोपला. विंडीजतर्फे फिलिप्सने 70 धावांत 3 तर रॉचने 43 धावांत 2, सेल्स, शिल्ड्स, ग्रिव्ह्ज आणि जेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
73 धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीजने दुसऱ्या डावाला सुरूवात केली. कॅम्पबेल आणि किंग यांनी सलामीच्या गड्यासाठी 24 धावांची भर घातली. पण नवोदित मिचेल ग्रेने कॅम्पबेलचा त्रिफळा उडविला. त्याने तीन चौकारांसह 14 धावा केल्या. दुसऱ्या बाजुने गोलंदाजी करणाऱ्या डफीने फिलीप्सला खाते उघडण्यापूर्वीच पायाचित केले. किंग 3 चौकारांसह 15 तर हॉज 3 धावांवर ख्घ्sळत आहे. 10 षटकांत विंडीजने दुसऱ्या डावात 2 बाद 32 धावा जमविल्या. विंडीजचा संघ अद्याप 41 धावांवर पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. उभय संघात 3 सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळविली जात आहे. विंडीजकडून दोन सोपी जीवदाने न्यूझीलंडला मिळाली. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात आघाडी घेता आली. या मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 18 डिसेंबरपासून माऊंट माँगेनुई येथे सुरु होईल.
संक्षिप्त धावफलक
विंडीज प. डाव सर्वबाद 205, न्यूझीलंड प. डाव 74.4 षटकांत सर्वबाद 278 (कॉन्वे 60, मिचेल हे, 61, विलियमसन 37, डॅरील मिचेल 25, लॅथम 11, फॉक्स नाबाद 23, फिलिप 3-70, रॉच 2-43, सील्स, शिल्ड्स, ग्रिव्हेज, चेस प्रत्येकी एक बळी), विंडीज दु. डाव 10 षटकांत 2 बाद 32 (कॅम्पबेल 14, किंग खेळत आहे 15, फिलीप 0, हॉज खेळत आहे 3, फडी व मिचेल रे प्रत्येकी 1 बळी).