द.आफ्रिकेचा पाकवर दणदणीत विजय
पाक 150 धावांनी पराभूत, अष्टपैलू कॅप सामनावीर, गुणतक्त्यात अग्रस्थानी झेप
वृत्तसंस्था/ कोलंबो
अनुभवी अष्टपैलू मेरिझान कॅपचे चमकदार प्रदर्शन आणि कर्णधार लॉरा वुलव्हार्ट व सुने लुस यांच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने महिला विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानचा डीएलएस नियमाच्या आधारे 150 धावांनी पराभव करून गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. सहा सामन्यांत त्यांचे 10 गुण झाले असून ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांचे प्रत्येकी 9 गुण झाले आहेत. कॅप सामनावीरची मानकरी ठरली.
35 वर्षीय कॅपने फलंदाजीत 43 चेंडूत 68 धावा तडकावल्या. त्याआधी वुलव्हार्ट (90) व सुने लुस (61) यांनी शानदार अर्धशतके नोंदवली. अखेरच्या टप्प्यात नदिन डी क्लर्कने जोरदार फटकेबाजी करीत केवळ 16 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार ठोकत 41 धावा काढल्याने द.आफ्रिकेने 40 षटकांत 9 बाद 312 धावा जमविल्या. पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 40 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कॅपने भेदक गोलंदाजी करीत पाकच्या तीन फलंदाजांना बाद केल्यानंतर 10 षटकांत 4 बाद 54 अशी पाकची स्थिती झाली होती. यावेळी पावसाचा पुन्हा व्यत्यय आल्याने सामना 20 षटकांचा करण्यात आला.
डीएलएसनुसार पाकला 20 षटकांत 234 धावांचे टार्गेट मिळाले. पण त्यांना 20 षटकांत 7 बाद 83 धावांपर्यंतच मजल मारता आली. द.आफ्रिकेने याआधीच उपांत्य फेरी गाठली असून त्यांचा एक सामना बाकी आहे.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 40 षटकांत 9 बाद 312 : वुलव्हार्ट 82 चेंडूत 90, सुने लुस 59 चेंडूत 61, कॅप 43 चेंडूत नाबाद 68, क्लो ट्रायोन 16 चेंडूत 21, नदिन डी क्लर्क 16 चेंडूत 41, अवांतर 22. सादिया इक्बाल 3-63, नशरा संधू 3-45. पाकिस्तान 20 षटकांत 7 बाद 83 : सिद्रा नवाझ नाबाद 22, नतालिया परवेझ 20, सिद्रा अमिन 13. मेरिझान कॅप 3-20, एन. शांगेस 2-19.