द.आफ्रिकेचा लंकेवर एकतर्फी विजय
सामनावीर लॉरा वुलव्हार्ट : नाबाद 60 व तझमिन ब्रिट्स : नाबाद 55
वृत्तसंस्था / कोलंबो
‘सामनावीर’ आणि कर्णधार लॉरा वूलव्हार्ट तसेच तझमिन ब्रिट्स यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर द.आफ्रिकेने शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात डकवर्थ-लेव्हिस नियमाच्या आधारे यजमान लंकेचा 31 चेंडू बाकी ठेवून 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी हा सामना प्रत्येकी 20 षटकांचा खेळविला.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने 20 षटकात 7 बाद 105 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना द.आफ्रिकेने 14.5 षटकात बिनबाद 125 धावा झोडपत लंकेचे आव्हान संपुष्टात आणले. ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका व इंग्लंड यांचे आता 9, 8, 7 गुण झाले आहेत तर भारत 4 गुणांवर आहे.
लंकेच्या डावात सलामीच्या विशमी गुणरत्नेने 33 चेंडूत 6 चौकारांसह 34, कर्णधार अटापटूने 2 चौकारांसह 11, समरविक्रमाने 13, दिलहारीने 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, सिल्वाने 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. लंकेला 10 अवांतर धावा मिळाल्या. द.आफ्रिकेतर्फे म्लाबाने 30 धावांत 3 तर क्लासने 18 धावांत 2 व डी. क्लर्कने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार वूलव्हार्ट आणि ब्रिट्स यांनी 89 चेंडूत अभेद्य 125 धावांची शतकी भागिदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. वूलव्हार्टने 47 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 60 तर ब्रिट्सने 42 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 55 धावा झळकविल्या. वूलव्हार्टने 41 चेंडूत 7 चौकारांसह तर ब्रिट्सने 42 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह अर्धशतके झळकविली. या विजयामुळे द.आफ्रिकेचा संघ आता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या समिप पोहोचला.
प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात लंकेच्या डावात पावसाचा अडथळा आला. लंकेने 12 षटकात 2 बाद 46 धावा जमविल्या असताना मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे सुमारे 5 तासांचा खेळ वाया गेल्याने पाऊस थांबल्यानंतर पंचांनी मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करत हा सामना प्रत्येकी 20 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. लंकेला या स्पर्धेमध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यांनी 5 सामन्यातून दोन गुण मिळविले आहेत. त्यांचे दोन सामने पावसामुळे वाया गेल्याने त्यांना प्रत्येक सामन्यात एक गुण मिळाला. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द.आफ्रिका या संघांबरोबरच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. पण द.आफ्रिकाबरोबरचा सामना 20 षटकांचा खेळविला गेल्याने तो निकाली करण्यात आला. त्यामुळे लंकेला या सामन्यात एक गुण मिळू शकला नाही.
संक्षिप्त धावफलक: लंका 20 षटकात 7 बाद 105 (गुणरत्ने 34, समरविक्रमा 13, दिलहारी 14, सिल्वा 18, अटापटू 11, अवांतर 10, म्लाबा 3-30, क्लास 2-18, डी. क्लर्क 1-23), द. आफ्रिका 14.5 षटकात बिनबाद 125 (वूलव्हार्ट नाबाद 60, ब्रिट्स नाबाद 55, अवांतर 10).