दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी मालिकाविजय
पाकवर 10 गड्यांनी दणदणीत मात, रबाडा, केशव महाराजचे प्रत्येकी 3 बळी, मसूदचे शतक, बाबर आझमचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था / केप टाऊन
येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच यजमान दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर दहा गड्यांनी दणदणीत विजय मिळवित मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. रिकेल्टनला सामनावीर तर मार्को जानसेनला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
या कसोटीत पाकचा संघ फॉलोऑन स्वीकारल्यानंतर संभाव्य पराभव लांबविण्याचा प्रयत्न केला. सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत पाकने दुसऱ्या डावात 5 बाद 398 धावा जमविल्या होत्या. यावेळी पाकचा संघ अद्याप 23 धावांनी पिछाडीवर होता. चहापानानंतर पाकचा दुसरा डाव 478 धावांत आटोपल्याने द.आफ्रिकेला विजयासाठी 58 धावांचे किरकोळ उद्दिष्ट मिळाले. त्यांनी ते एकही गडी न गमविता 7.1 षटकांत बिनबाद 58 धावा जमवित विजय साकार केला. द.आफ्रिकेचा हा डब्ल्यूटीसीमधील सलग सातवा कसोटी विजय आहे. या विजयाने त्यांचे डब्ल्यूटीसीमध्ये अग्रस्थानही निश्चित झाले.
या मालिकेतील पहिली कसोटी द. आफ्रिकेने यापूर्वीच जिंकून आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. द. आफ्रिकेने पहिल्या डावात 615 धावांचा डोंगर उभा केला. रेयान रिकेल्टनने शानदार द्विशतक (259), कर्णधार बवुमा आणि व्हेरेन यांनी शानदार शतके झळकविली. जानसेनने 62 धावांचे योगदान दिले. त्यानंतर द. आफ्रिकेने पाकला पहिल्या डावात 194 धावांत उखडले. त्यामुळे पाकला द. आफ्रिकेकडून फॉलोऑन स्वीकारावा लागला. पाकने 1 बाद 213 या धावसंख्येवरन सोमवारी खेळाला पुढे सुरुवात केली.
दरम्यान, उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात पाकने आणखी दोन गडी गमविताना 99 धावांची भर घातली. उपाहारावेळी पाकने 77 षटकात 3 बाद 312 धावांपर्यंत मजल मारली होती. बाबर आझम आणि शान मसूद या सलामीच्या जोडीने 46.2 षटकात 205 धावांची द्विशतकी भागिदारी केली. बाबर आझमने 10 चौकारांसह 81 धावा जमविल्या. त्यानंतर खुर्रम शहजाद 3 चौकारांसह 18 धावा जमवित झेलबाद झाला. कमरान गुलामने 4 चौकारांसह 28 धावा केल्या आणि तो रबाडाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. सौद शकीलने 23 धावांचे योगदान दिले. रबाडाने त्याला झेलबाद केले. चहापानावेळी पाकने 103 षटकात 5 बाद 398 धावा जमविल्या होत्या. मोहम्मद रिझवान 41, सलमान आगाने 48, आमेर जमालने 34, मिर हामझाने 16 धावा जमविल्या. त्यांना अवांतराच्या रूपात 44 धावा मिळाल्या. विशेष म्हणजे या डावात 3 बळी मिळविणाऱ्या रबाडाने या वर्षात 50 नोबॉल टाकण्याचा पराक्रम केला. केशव महाराजनेही 3 बळी मिळविले.
त्याने डेव्हिड बेडिंगहॅम व एडन मार्करम यांनी 7.1 षटकांत 58 धावा जमवित विजय मिळविला. बेडिंगहॅम 30 चेंडू 44, मार्करम 13 चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिले.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 141.3 षटकात सर्वबाद 615, पाक. प. डाव 54.2 षटकात सर्वबाद 194, पाक. दु. डाव 103 षटकात 5 बाद 398 (शान मसूद 145, बाबर आझम 81, खुर्रम शहजाद 18, कामरान गुलाम 28, 41, सलमान आगा 48, जमाल 34, हामझा 16, अब्बास नाबाद 0, सईम आयुब दुखापतीमुळे खेळला नाही, अवांतर 44, रबाडा, केशव महाराज प्रत्येकी 3, जानसेन प्रत्येकी 2 बळी, मफाका 1-47)