For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुमराहच्या गोलंदाजीसमोर द.आफ्रिकेची दाणादाण

06:59 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
बुमराहच्या गोलंदाजीसमोर द आफ्रिकेची दाणादाण
Advertisement

द.आफ्रिकेचा 159 धावांत धुव्वा, कुलदीप-सिराजचाही भेदक मारा, भारत 1 बाद 37 

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

जसप्रित बुमराहच्या अप्रतिम नियंत्रित अचूक व स्विंग गोलंदाजीसमोर शुक्रवारी पहिल्या कसोटीतील पहिल्याच दिवशी द. आफ्रिकेची पहिल्या डावात दाणादाण उडाली आणि त्यांचा केवळ 159 धावांत धुव्वा उडाला. त्यानंतर भारताने दिवसअखेर पहिल्या डावात 1 बाद 37 धावा जमविल्या. बुमराहने 27 धावांत 5 गडी बाद केले तर कुलदीप यादव व सिराज यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. या सामन्यात द. आफ्रिकेने 10 षटकांत बिनबाद 57 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर 10 बळी 45 षटकांत 102 धावांत बाद झाले.

Advertisement

द.आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इडन गार्डन्सची खेळपट्टी कोरडी वाटत असल्याने भारताने पहिल्यांदाच 2012 नंतर 4 फिरकी गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला. पण बुमराहने या खेळपट्टीचा आपल्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर पुरेपूर फायदा उठविला. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 वेळा एका डावात 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही.

दरम्यान अॅडन मार्करम आणि रिकेल्टन या सलामीच्या जोडीने द. आफ्रिकेच्या डावाला दमदार सुरूवात करुन देताना 10.3 षटकात 57 धावांची भागिदारी केली. मार्करमने 48 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या तर रिकेल्टनने 22 चेंडूत 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. मार्करमला आपले खाते उघडण्यासाठी 23 चेंडू खेळावे लागले. नंतर त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर दोन अप्रतिम चौकार ठोकले तसेच त्याने अक्षरच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेने षटकारही खेचला. त्याने षटकामागे पाच धावांची गती राखली होती. दुसऱ्या बाजुने रिकेल्टनने सावध फलंदाजी करत एकेरी-दुहेरी धावांवर अधिक भर दिला. या जोडीने 56 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. खेळाच्या पहिल्या सत्रातील झालेल्या जलपानानंतर बुमराहने आपल्या सलग दोन षटकांमध्ये 5 चेंडूंच्या अंतराने द.आफ्रिकेचे दोन गडी बाद केले. बुमराहचे गोलंदाजीच्या पहिल्या टप्प्याचे पृथ:क्करण 7-4-9-2 असे किफायतशीर होते. 140 कि.मी. वेगाने गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने रिकेल्टनचा त्रिफळा उडविला. त्याने 22 चेंडूत 4 चौकारासह 23 धावा जमविल्या. यानंतर बुमराहने काही मिनिटांतच मार्करमला आपल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. बुमराहचे चेंडू या खेळपट्टीवर चांगलेच स्वींग होत असल्याने द. आफ्रिकेच्या फलंदाजांना ते वारंवार चकवत होते. मुल्डेर आणि कर्णधार बवुमा यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरण्याचा प्रयत्न केला. पण कुलदीप यादवच्या फिरकीवर कर्णधार बवुमा जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याने 3 धावा जमविल्या. उपाहारावेळी द.आफ्रिकेची स्थिती 27 षटकात 3 बाद 105 अशी होती. मुल्डेर 22 तर झोर्झी 15 धावांवर खेळत होते. द. आफ्रिकेचे शतक 147 चेंडूत फलकावर लागले.

सिराज-कुलदीप प्रभावी

खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी द.आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच दमविले. पहिल्या सत्रात मोहम्मद सिराजने आपल्या 6 षटकांत 34 धावा दिल्या होत्या. पण दुसऱ्या सत्रात त्याने द. आफ्रिकेच्या जॅन्सेन आणि व्हेरेन या दोन फलंदाजांना केवळ 4 चेंडूंच्या फरकाने बाद केले. सिराजचे हे दहावे शतक होते. तत्पूर्वी कुलदीप यादवने मुल्डेरला पायचित केले. मुल्डेरने 51 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या दुसऱ्या हप्त्यात झोर्झीला पायचीत केले. त्याने 55 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 24 धावा जमविल्या. द. आफ्रिकेची यावेळी स्थिती 5 बाद 120 अशी होती. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर व्हेरेन पायचित झाला. त्याने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. सिराजने याच षटकातील चौथ्या चेंडूवर जॅन्सेनचा यॉर्करवर त्रिफळा उडविला. अक्षर पटेलने बॉशला तीन धावांवर पायचित केले. चहापानावेळी द. आफ्रिकेने 52 षटकात 8 बाद 157 धावा जमविल्या होत्या. द. आफ्रिकेने खेळाच्या दुसऱ्या सत्रात 5 गडी गमविताना 52 धावांची भर घातली.

चहापानानंतर द. आफ्रिकेचा प. डाव केवळ 3 षटकांत आटोपला. त्यांचे शेवटचे दोन गडी 5 धावांची भर घालत तंबूत परतले. बुमराहने हार्मरचा 5 धावांवर त्रिफळा उडविला तर त्यानंतर त्याने याच षटकातील शेवटच्या चेंडूवर केशव महाराजला खाते उघडण्यापूर्वी पायचित केले. स्टब्ज 1 चौकारांसह 15 धावांवर नाबाद राहिला. द.आफ्रिकेचा पहिला डाव 55 षटकात 159 धावांत आटोपला. बुमराहने 27 धावांत 5 तर सिराजने 47 धावांत 2, कुलदीप यादवने 36 धावांत 2 आणि अक्षर पटेलने 21 धावांत 1 गडी बाद केला.

भारताच्या पहिल्या डावाला जैस्वाल आणि राहुल यांनी सुरूवात केली. पण सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जॅन्सेनने जैस्वालचा त्रिफळा उडविला. त्याने 27 चेंडूत 3 चौकारांसह 12 धावा जमविल्या. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सावध फलंदाजी करत उर्वरीत कालावधीत संघाची पडझड होऊ दिली नाही. 20 षटकांत भारताने पहिल्या डावात 1 बाद 37 धावा जमविल्या. राहुल 2 चौकारांसह 13 तर वॉशिंग्टन सुंदर 6 धावांवर खेळत आहे. द. आफ्रिकेच्या जॅन्सेनने 11 धावांत 1 गडी बाद केला. खेळाच्या पहिल्या दिवशी सुमारे 36 हजार शौकिन उपस्थित होते.

बुमराहची कामगिरी

भारताचा हुकमी वेगवान गोलंदाज बुमराहने आपल्या भेदक माऱ्याच्या 27 धावांत 5 गडी बाद केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 96 डावांत 16 व्यांदा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्याचप्रमाणे सलामीच्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केल्यानंतर द. आफ्रिकेची कसोटी क्रिकेटमधील ही दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे. 2018 साली केपटाऊन येथे झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेचा दुसरा डाव 130 धावांत आटोपला होता.

संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका प. डाव 55 षटकांत सर्वबाद 159 (मार्करम 31, रिकेल्टन 23, मुल्डेर 24, झोर्झी 24, व्हेरेन 16, स्टब्ज नाबाद 15, अवांतर 15, बुमराह 5-27, मोहम्मद सिराज 2-47, कुलदीप यादव 2-36, अक्षर पटेल 1-21), भारत प. डाव 20 षटकात 1 बाद 37 (जैस्वाल 12, केएल राहुल खेळत आहे 13, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 6, अवांतर 6, जॅन्सेन 1-11).

Advertisement
Tags :

.