भारतीय महिलांसमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील आज गुरुवारी होणाऱ्या सामन्यात भारताला पुन्हा उसळी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार असून भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांना स्पर्धेतील संथ मोहिमेला अधिक वेग आणण्याच्या दृष्टीने त्यांच्या वेगळ्या मार्गांचा त्याग करावा लागेल.
गुणतालिकेवर एक नजर टाकली तर भारत आरामात दुसऱ्या स्थानावर विराजमान झालेला असल्याचे सहज लक्षात भरेल. पण ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे संघ तिसऱ्या स्थानावर घसरू शकतो. भारताने दोन सामन्यांत दोन विजय मिळविलेले आहेत. परंतु या चमकदार परिस्थितीखाली एक समस्या दडलेली असून स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उत्साही जेमिमा रॉड्रिग्ज यांना आतापर्यंत फारशा धावा काढता आल्या नाहीत आणि ही बाब भारताची चिंता वाढवत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानविऊद्ध या तिघांनाही चांगली कामगिरी करता आली नाही, ज्यामुळे भारताला दुसऱ्या फळीतील हरलीन देओल, अमनजोत कौर, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांच्यावर अवलंबून राहावे लागले. भारताची लंकेविऊद्ध 6 बाद 124 आणि पाकिस्तानविऊद्ध 5 बाद 159 अशी परिस्थिती झाली होती आणि जर उशिरा आलेल्या फलंदाजांना धावा काढता आल्या नसत्या, तर प्रत्येक वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनली असती.
दक्षिण आफ्रिकेसारख्या सुसज्ज संघाविऊद्ध जर याचीच पुनरावृत्ती झाली, तर ते विनाशकारी ठरेल आणि या सामन्यात भारताला त्यांच्या स्टार त्रिकुटाकडून मोठ्या योगदानाची आवश्यकता भासेल. जर निकाल भारताच्या बाजूने गेला नाही, तर ते केवळ गुणतालिकेतील त्यांचे स्थान धोक्यात आणणार नाही, तर 12 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजेत्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या सामन्यापूर्वी त्यांना अधिक कठीण परिस्थितीत ढकलेल. अर्थात, भारतीय व्यवस्थापन आतापर्यंतच्या सामन्यांमधील सकारात्मक बाजू पाहेल, ज्यात त्यांच्या स्टार फलंदाजांच्या मोठ्या योगदानाशिवाय विजय मिळवण्याची बाब समाविष्ट होते. यातून संघात अनेक सामने जिंकून देणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती आहे ही बाब त्यांना दिलासा देऊन जाईल.
असे असले, तरी मानधना, हरमनप्रीत आणि रॉड्रिग्ज यांच्याकडून चांगल्या डावाची नोंद होण्याची गरज व्यवस्थापन देखील मान्य करेल. दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघांविऊद्ध चांगली धावसंख्या उभारणे आणि विजयी धावसंख्या उभारणे यात जो फरक आहे तो या फलंदाजांच्या योगदानामुळे घडून येऊ शकतो. दुसरीकडे, गोलंदाजांनी आतापर्यंत भारतासाठी सातत्याने कामगिरी केली आहे. तथापि, त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की, येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमची खेळपट्टी गुवाहाटी आणि कोलंबोच्या खेळपट्ट्यांसारखी चांगली मदत करणारी नाही. दीप्ती शर्मा सहा बळी घेऊन बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर तिला सहकारी फिरकीपटू स्नेह राणा आणि श्रीचरणी तसेच वेगवान गोलंदाज क्रांती गौड यांचे उत्तम सहकार्य मिळाले आहे. गौडने खूप प्रभावी कामगिरी केली आहे.
भारत अष्टपैलू अमनजोत कौर कशी सावरते त्याच्यावर देखील लक्ष ठेवून असेल. ती आजारपणामुळे पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यात खेळू शकली नव्हती आणि जर ती तंदुऊस्त असेल, तर ती अकरा जणांमध्ये रेणुका सिंह ठाकूरची जागा घेईल. अमनजोत क्रमवारीत एक अतिशय सोयीस्कर फलंदाजी पर्याय देते. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविऊद्ध भारताला त्यांचे सर्व पर्याय तयार ठेवावे लागतील. दक्षिण आफ्रिकेने 69 धावांवर संपुष्टात आलेला डाव आणि परिणामी इंग्लंडविरुद्ध 10 गड्यांनी स्वीकारावा लागलेला पराभव यातून उसळी घेत मागील सामन्यात न्यूझीलंडवर सहा गड्यांनी विजय मिळवला. त्यांची शतकवीर तझमिन ब्रिट्स आणि विश्वासार्ह सून लुस फॉर्ममध्ये परतल्या आहेत आणि त्यांना कर्णधार लॉरा वोल्वार्ड, अनुभवी मॅरिझान कॅप आणि अँनेके बॉश यांच्याकडूनही चांगल्या योगदानाची अपेक्षा असेल. नॉनकू म्लाबा, अयाबोंगा खाका, कॅप, मसाबता क्लास आणि क्लो टायरॉन यांचा समावेश असलेला त्यांचा गोलंदाजी विभाग भारतीय फलंदाजीचे काम कठीण करू शकतो.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.