द.आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर मोठा विजय
कसोटी मालिकेत द. आफ्रिकेची आघाडी, प्रेटोरियस ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / बुलावायो
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत द. आफ्रिकेने विजयी सलामी देताना येथे मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 328 धावांनी दणदणीत पराभव केला. शानदार दीडशतक झळकविणाऱ्या द. आफ्रिकेच्या प्रेटोरियसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. द. आफ्रिकेने हा सामना खेळाचा एक दिवस बाकी ठेवून जिंकला.
या पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने आपला पहिला डाव 9 बाद 418 धावांवर घोषित केला. त्यानंतर झिम्बाब्वेचा पहिला डाव 251 धावांवर समाप्त झाला. द. आफ्रिकेने पहिल्या डावात 167 धावांची भक्कम आघाडी मिळविली. द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात 369 धावा जमवित झिम्बाब्वेला निणर्गायक विजयासाठी 537 धावांचे कठीण आव्हान दिले. द. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मुल्डेरने 147 धावांची खेळी केली तर कर्णधार केशव महाराजने अर्धशतक झळकविले. झिम्बाब्वेने 1 बाद 32 या धावसंख्येवरुन मंगळवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 66.2 षटकात 208 धावांत आटोपला.
झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात वेलिंग्टन मसाकेट्झाने 92 चेंडूत 9 चौकारांसह 57 तर कर्णधार इर्व्हिनने 77 चेंडूत 7 चौकारांसह 49 धावा जमविल्या. मुझारबनीने 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 32 धावा केल्या. खेळाच्या चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत झिम्बाब्वेने 49 षटकात 6 बाद 150 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या पहिल्या सत्रात झिम्बाब्वेने 5 गडी गमविताना 118 धावा जमविल्या. उपाहारानंतर तासभराच्या कालावधीत झिम्बाब्वेचे शेवटचे चार गडी बाद झाले. दुसऱ्या सत्रात मसाकेट्झाने 68 चेंडूत 8 चौकारासह 50 धावा जमविताना कर्णधार इर्व्हिनसमवेत सातव्या गड्यासाठी 83 धावांची भागिदारी केली. झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात शतक झळकविणाऱ्या सेन विलियम्सने 5 चौकारांसह 26 धावा जमविल्या तर मुझारबनीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 29 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 32 धावा केल्या. पण इर्व्हिन बाद झाल्यानंतर द. आफ्रिकेला झिम्बाब्वेचा डाव गुंडाळण्यास अधिक वेळ लागला नाही. द. आफ्रिकेतर्फे बॉश्चने 43 धावांत 5 तर युसुफने 22 धावांत 3 तसेच केशव महाराज आणि ब्रेव्हिस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 9 बाद 418 डाव घोषित, झिम्बाब्वे प. डाव 251, द. आफ्रिका दु. डाव 369, झिम्बाब्वे दु. डाव 66.2 षटकात सर्वबाद 208 (वेलिंग्टन मसाकेट्झा 57, मुझारबनी नाबाद 32, इर्व्हिन 49, विलियम्स 26, अवांतर 16, बॉश्च 5-43, युसुफ 3-22, केशव महाराज व ब्रेव्हीस प्रत्येकी 1 बळी).