द. आफ्रिकेची कसोटी मालिकेत विजयी सलामी
वृत्तसंस्था/मिरपूर
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत गुरुवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी द. आफ्रिकेने बांगलादेशचा 7 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. द. आफ्रिका संघातील फलंदाज आणि शतकवीर काईल व्हेरेनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 46 धावांत 6 गडी बाद केले. तसेच द. आफ्रिकेने तब्बल 12 वर्षांनंतर आशिया खंडात आपला पहिला कसोटी विजय नोंदविला. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी चेतोग्राम येथे येत्या मंगळवारपासून सुरु होईल. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत आटोपला. त्यानंतर द. आफ्रिकेने पहिल्या डावात 308 धावा जमवित बांगलादेशवर 202 धावांची भक्कम आघाडी मिळविली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव 40.1 षटकात सर्व बाद 106, द. आफ्रिका प. डाव 88.4 षटकात सर्व बाद 308, (व्हेरेन 114, मुल्डेर 54, पीट 32, झोर्जी 30, रिकेल्टन 27, टी. इस्लाम 5-122, हसन मेहमुद 3-66, मेहिदी हसन मिराज 2-63), बांगलादेश दु. डाव 89.5 षटकात सर्व बाद 307 : (मेहिदी हसन मिराज 97, जाकेर अली 58, हसन जॉय 40, शांतो 23, मुश्फिकुर रहीम 33, अवांतर 21, रबाडा 6-46, केशव महाराज 3-105), द. आफ्रिका दु. डाव 22 षटकात 3 बाद 106-(झोर्जी 41, मारक्रम 20, स्टब्ज नाबाद 30, बेडिंगहॅम 12, टी. इस्लाम 3-43)