दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा सामना आज पाकिस्तानशी
वृत्तसंस्था/ कोलंबो
उपांत्य फेरीत आधीच स्थान मिळविलेली दक्षिण आफ्रिका आज मंगळवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषकात पाकिस्तानचा सामना करताना आपली विजयी लय कायम ठेवण्याचा आणि गट टप्प्यातील अव्वल दोन स्थानांपैकी एक मिळवण्याच्या प्रयत्न करेल.
कोलंबोचे हवामान पुन्हा एकदा परिस्थिती बिघडवू शकते आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाकडे आता आठ गुण आहेत. त्यांना साखळी स्पर्धा संपण्यापूर्वी आणखी दोन गुण जोडायचे आहेत. यामुळे त्यांना उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला टाळता येईल. ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर राहण्याची शक्यता असून ते चौथ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना करतील. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट उणे 0.440 आहे, जो भारताच्या 0.526 पेक्षा खूपच कमी आहे. तथापि, सलग तीन पराभवांमुळे भारत फक्त 8 गुणांपर्यंत पोहोचू शकला आहे.
मंगळवारी सर्वांचे लक्ष आकाशाकडे असेल. कारण कोलंबोमध्ये आतापर्यंत अनेक वेळा पावसामुळे खेळ रद्द झाल्याने आयसीसीने वर्षाच्या या वेळी श्रीलंकेच्या राजधानीत सामने आयोजित करण्याच्या निर्णयाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. कोलंबोमध्ये नऊ सामन्यांपैकी पाच सामन्यांचा निकाल खराब हवामानामुळे लागला नाही. फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने विश्वचषकाच्या तयारीपोटी झालेल्या द्विपक्षीय मालिकेत एक एकदिवसीय सामना जिंकलेला असला, तरी कागदावर पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेची बरोबरी करू शकत नाही. कर्णधार फातिमा आणि अनुभवी डायना बेगसह पाकच्या गोलंदाजी विभागाकडे प्रेमदासा स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर प्रभाव पाडण्याची काही प्रमाणात ताकद आहे. परंतु त्यांच्या फलंदाजी विभागाकडे 175 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्याची क्षमता नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा विचार करता लॉरा वोल्वार्ड्ट आणि तझमिन ब्रिट्ससारख्या फलंदाज वरच्या फळीत खूप मजबूत दिसतात, तर सून लुस आणि मॅरिझान कॅप मधल्या षटकांमध्ये गती कायम ठेवू शकतात. खेळाच्या अंतिम टप्प्यात फटकेबाजीसाठी त्यांच्याकडे नादिन डी क्लार्क आहे, त्यामुळे कोणत्याही खेळपट्टीवर 250 धावा करणे वा तितक्या धावांच्या पाठलाग करणे दक्षिण आफ्रिकी महिलांच्या आवाक्यातील दिसते. त्यांच्या बहुतेक फलंदाजांचा स्ट्राईक रेट 80 ते 120 दरम्यान आहे. त्या तुलनेत पाकिस्तानच्या कोणत्याही वरच्या फळीतील फलंदाजांचा देखील स्ट्राईक रेट 75 च्या जवळपास नाही. 75 च्या जवळपास स्ट्राईक रेट असलेली एकमेव खेळाडू डायना आहे, जी तळाकडे फलंदाजीस येते. पाकिस्तानचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले, तरी त्यांना काही फायदा झाला नाही. ते आधीच सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत आणि पाकिस्तानचे ध्येय दिलासा मिळवून देणारा विजय मिळविण्याचे असेल. असा विजय मिळाल्यास तो स्पर्धेतील फलंदाजांच्या कमकुवत कामगिरीनंतर खालावलेले संघाचे मनोबल निश्चितच उंचावेल.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.