द.आफ्रिका महिला प्रथमच अंतिम फेरीत
सामनावीर लॉरा वुलव्हार्टचे संस्मरणीय शतक, कॅपचे 5 बळी, ब्रंट, कॅप्सेची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
कर्णधार लॉरा वुलव्हार्टने नोंदवलेले संस्मरणीय शतक आणि मारिझान कॅपच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिका महिला संघाने बलाढ्या इंग्लंड महिला संघाचा 125 धावांनी दणदणीत पराभव करून महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश मिळविला. वुलव्हार्टला सामनावीराचा बहुमान मिळाला. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर वुलव्हार्टने शानदार शतक नोंदवत आपल्या संघाला निर्धारित 50 षटकांत 7 बाद 319 अशी भक्कम धावसंख्या रचून दिली. तिने 143 चेंडूत 20 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने 169 धावांची संस्मरणीय खेळी केली. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनच्या (4-44) भेदक माऱ्यामुळे दोनदा संघाचा डाव अल्पसा कोसळला होता. पण त्यावर मात करून लॉराने संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. तिने तझमिन ब्रिट्ससमवेत 116 धावांची व कॅपसमवेत 72 धावांची भागीदारी केली. ब्रिट्सने 45, कॅपने 33 चेंडूत 42, क्लो ट्रायॉनने 26 चेंडूत नाबाद 33 तर डी क्लर्कने 6 चेंडूत नाबाद 11 धावा फटकावल्या. इंग्लंडच्या लॉरेन बेलने 2, नॅट सिव्हर ब्रंटने एक बळी मिळविला.
चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंडला विक्रमी पाठलाग करण्यासाठी अपवादात्मक कामगिरी करण्याची गरज होती. पण कॅपने पाच बळी मिळवित इंग्लंडचा कणाच मोडला आणि त्यांचा डाव 42.3 षटकांत 194 धावांत आटोपला. कॅपने 20 धावांत 5 बळी टिपले. अॅमी जोन्स, माजी कर्णधार हीदर नाईन व टॅमी ब्युमाँट शून्यावर बाद झाल्यानंतर इंग्लंडची स्थिती 3 बाद 1 अशी झाली होती. नॅट सिव्हर ब्रंट व अॅलिस कॅप्से यांनी अर्धशतके नोंदवत डाव सावरताना 107 धावांची भागीदारी केली. पण जोडी फुटल्यानंतर इंग्लंडच्या आशा संपुष्टात आल्या आणि नंतर त्यांचा डाव 194 धावांत संपुष्टात आला. द.आफ्रिकेने यापूर्वी दोनवेळा टी-20 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका महिला संघ 50 षटकांत 7 बाद 319 : वुलव्हार्ट 143 चेंडूत 169, ब्रिट्स 45, कॅप 42, ट्रायॉन 26 चेंडूत नाबाद 33, डी क्लर्क नाबाद 11, अवांतर 13. एक्लेस्टोन 4-44, बेल 2-55. इंग्लंड महिला संघ 42.3 षटकांत सर्व बाद 194 : नॅट सिव्हर ब्रंट 76 चेंडूत 64, कॅप्से 71 चेंडूत 50, स्मिथ 27, डॅनी वॅट हॉज 31 चेंडूत 34, कॅप 5-20, डी क्लर्क 2-24, आयाबोंगा खाका 1-28, सुने लुस 1-41.