For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोमांचक सामन्यात द.आफ्रिकेचा विजय

06:58 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
रोमांचक सामन्यात द आफ्रिकेचा विजय
Advertisement

दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा 4 गड्यांनी पराभव : मालिकेत बरोबरी : विराट-ऋतुराजची शतके वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

एडन मार्करमच्या दमदार शतकानंतर ब्रेव्हिसच्या बॅटमधून आलेले झंझावाती अर्धशतक आणि मॅथ्यू ब्रीत्झकेच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने 350 पार धावांची लढाई जिंकत भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. रायपूरचे मैदान मारत आफ्रिकेने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. परिणामी किंग कोहलीसह ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

Advertisement

येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 4 गड्यांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 5 बाद 358 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यानंतर आफ्रिकेने चार गड्यांच्या मोबदल्यात आणि चार बॉल शिल्लक ठेवत भारतावर विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता, उभय संघातील तिसरा आणि निर्णायक सामना विशाखापट्टणममध्ये 6 डिसेंबरला होईल.

प्रारंभी, टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेने 26 धावांवर डीकॉकच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन टेम्बा बावुमा 46 धावा करुन बाद झाला. डेवाल्ड ब्रेविसने 54 धावा केल्या. एडन मार्करमने शानदार शतकी खेळी साकारताना 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारासह 110 धावा करत विजयात मोलाचे योगदान दिले. याशिवाय, ब्रीत्झकेने 68 धावा फटकावल्या. यानंतर बॉश आणि केशव महाराज यांनी चिवटपणे झुंज देत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आफ्रिकेने विजयी लक्ष्य 49.2 षटकांत पूर्ण करत विजयाला गवसणी घातली.

टीम इंडियाचा पराभव

वनडेत सलग 20 व्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बावुमाचे या सामन्यातून पुनरागमन झाले. त्याने पुनरागमनानंतर नाणेफेकही जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. त्यामुळे या सामन्यातही भारताकडून डावाची सुरुवात रोहित शर्मासह यशस्वी जैस्वालने केली. जैस्वालने सुरुवात चांगली केली होती. रोहितला पहिल्या 4 षटकात केवळ तीन चेंडू खेळता आले होते. रोहितने 5 व्या षटकात सलग तीन चौकारांसह चांगली सुरुवात केली. पण त्याच्या सलग तीन चौकारांनंतर नांद्रे बर्गरने त्याला यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकच्या हातून झेलबाद केले. रोहितने 8 चेंडूत 14 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर 10 व्या षटकात यशस्वी जैस्वालही बाद झाला. त्याला मार्को जॅन्सेनने 38 चेंडूत 22 धावांवर कॉर्बिन बॉशच्या हातून झेलबाद केले.

 

विराटचा पुन्हा एकदा जलवा, ऋतुराजचाही धमाका

भारताने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडची जोडी जमली. त्यांनी नंतर 26 षटके एकत्र फलंदाजी करताना मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ऋतुराजने आधी 52 चेंडूत अर्धशतक केले, तर विराटने 47 चेंडूत अर्धशतक केले. ऋतुराजने नंतर आणखी आक्रमक खेळ करताना 77 चेंडूत वनडे कारकिर्दीतील पहिले शतक केले. पण त्याला शतकानंतर 36 व्या षटकात जॅन्सेनने बाद केले. ऋतुराजने 83 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावांची शानदार खेळी साकारली. विराटनेही पुन्हा एकदा धमाका करताना वनडेतील 53 वे शतक पूर्ण केले. पण शतकानंतर त्यालाही लुंगी एनगिडीने बाद केले. त्याने 93 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावा फटकावल्या. विराट आणि ऋतुराज यांनी तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली.

केएलचेही आक्रमक अर्धशतक

विराट बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 1 धावेवर धावबाद झाला. मात्र कर्णधार केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने आणखी विकेट न गमावता भारताला 50 षटकात 5 बाद 358 धावांपर्यंत पोहोचवले. केएलने आपल्या आक्रमक अंदाजात खेळताना आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 43 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी केली. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. जडेजाने 27 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला 5 बाद 358 धावापर्यंत मजल मारता आली. आफ्रिकेकडून मार्को जॅन्सेनने 2 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

भारत 50 षटकांत 5 बाद 358 (यशस्वी जैस्वाल 22, रोहित शर्मा 14, विराट कोहली 93 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह 102, ऋतुराज गायकवाड 83 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारासह 105, केएल राहुल 43 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारासह नाबाद 66, रवींद्र जडेजा नाबाद 24, जॅन्सेन 2 बळी, बर्गर आणि एन्गिडी प्रत्येकी 1 बळी).

द.आफ्रिका 50 षटकांत 6 बाद 362 (मार्करम 110, टेम्बा बावुमा 46, ब्रित्झके 68, ब्रेव्हिस 54, बॉश नाबाद 29, केशव महाराज नाबाद 10, प्रसिध्द कृष्णा आणि अर्शदीप प्रत्येकी 2 बळी, हर्षित राणा आणि कुलदीप यादव प्रत्येकी 1 बळी).

विराट कोहलीचा धमाका

रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला. रांचीत पहिल्या सामन्यात रविवारी धुवांधार फटकेबाजी केल्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातही त्याने त्याच थाटात गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि या मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकले. विशेष म्हणजे, कोहलीने 90 चेंडूत त्याचे 53 वे वनडे शतक झळकावले. या मालिकेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. दरम्यान, वनडेत सर्वाधिक शतकांचा आपला विक्रम अधिक भक्कम करताना कोहलीने 11 व्या वेळी सलग दोन शतके झळकवण्याचा पराक्रम करून दाखवला. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक वेळा सलग दोन शतके झळकावणारे फलंदाज

विराट कोहली- 11 वेळा

एबी डिव्हिलियर्स - 6 वेळा

रोहित शर्मा- 4 वेळा

Advertisement
Tags :

.