For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण आफ्रिकेचा आठ गड्यांनी विजय

06:50 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण आफ्रिकेचा आठ गड्यांनी विजय
Advertisement

मालिकेत 1-1 बरोबरी, झोर्झीचे नाबाद शतक, हेंड्रीक्सचे अर्धशतक, बर्गरचे 3 बळी, सुदर्शन, राहुल यांची अर्धशतके वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ गेकेबेरा (दक्षिण आफ्रिका)

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या दिवस-रात्रीच्या दुसऱ्या सामन्यात झॉर्झीच्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करुन 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे दिवस-रात्रीचा खेळविला जाणार आहे.

Advertisement

सलामीचा साई सुदर्शन आणि कर्णधार केएल राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा डाव 211 धावांवर आटोपला. या मालिकेतील साई सुदर्शनचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे बर्गरने 3 तर हेंड्रीक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 42.3 षटकात 2 बाद 215 धावा जमवित 8 गड्यांनी विजय नोंदविला.

या सामन्यात भारताची फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीही निष्प्रभ ठरली. हेंड्रीक्स आणि झॉर्झी यांनी एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत धावफलक हालता ठेवला. या जोडीने 27.5 षटकात 130 धावांची शतकी भागिदारी केली. 28 व्या षटकात अर्शदीप सिंगने हेंड्रीक्सला मुकेश कुमारकरवी झेलबाद केले. त्याने 81 चेंडूत 7 चौकारांसह 52 धावा जमविल्या. झॉर्झी आणि व्हॅन डेर ड्युसेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 6 धावांची गरज असताना रिंकू सिंगने व्हॅन डेर ड्युसेनला झेलबाद केले. त्याने 51 चेंडूत 5 चौकारांसह 36 धावा जमविल्या. झॉर्झी आणि कर्णधार मार्करम यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. झॉर्झीने 122 चेंडूत 6 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 119 धावा झळकाविल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंग आणि रिंकू सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षणही गचाळ झाले.

खराब सुरुवात

या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेवर आघाडी यापूर्वीच घेतली होती. मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. बर्गरच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीचा ऋतुराज गायकवाड पायचीत झाला. याच षटकातील पहिल्या चेंडूवर गायकवाडने चौकाराने आपले खाते उघडले होते.

साईसुदर्शन आणि तिलक वर्मा या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर सावध फलंदाजी करताना दुसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भागिदारी केली. बर्गरने तिलक वर्माला झेलबाद केले. त्याने 10 धावा जमविल्या. साई सुदर्शन आणि कर्णधार केएल राहुल यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागिदारी केली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकाविणाऱ्या साई सुदर्शनने काही आक्रमक फटके मारले. त्याने आपले अर्धशतक 65 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. विलियम्सच्या उसळत्या चेंडूवर क्लासनने सुदर्शनला टिपले. त्याने 83 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 62 धावा जमविल्या.

भारताने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमाविला. भारताचे अर्धशतक 80 चेंडूत तर शतक 140 चेंडूत फलकावर लागले. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. हेंड्रीक्सने सॅमसनचा त्रिफळा उडविला. त्याने 1 चौकारासह 12 धावा केल्या. केएल राहुलने आपले अर्धशतक 60 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नोंदविले. भारताच्या 150 धावा 206 चेंडूत फलकावर लागले. बर्गरने आपल्या गोलंदाजीवर भारताला आणखी एक धक्का देताना कर्णधार राहुलला मिलरकरवी झेलबाद केले. राहुलने 64 चेंडूत 7 चौकारांसह 56 धावा केल्या. भारताचा निम्मा संघ 35.4 षटकात 167 धावात तंबूत परतला होता. भारताच्या शेवटच्या पाच फलंदाजांनी 44 धावांची भर घातली. रिंकू सिंगने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, अक्षर पटेलने 7, कुलदीप यादवने 1, अर्शदीप सिंगने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18, आवेश खानने 1 षटकारासह 9 धावा जमविल्या. भारताच्या डावात 11 अवांतर धावा मिळाल्या. भारताच्या डावामध्ये 4 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे बर्गरने 3, हेंड्रीक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2, विलियम्स व मार्करम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : भारत 46.2 षटकात सर्व बाद 211 (साई सुदर्शन 62, केएल राहुल 56, तिलक वर्मा 10, सॅमसंग 12, रिंकू सिंग 17, अर्शदीप सिंग 18, अक्षर पटेल 7, आवेश खान 9, मुकेशकुमार नाबाद 4, कुलदीप यादव 1, गायकवाड 4, अवांतर 11, बर्गर 3-30, हेंड्रीक्स 2-34, केशव महाराज 2-51, विलियम्स 1-49, मारक्रेम 1-28), दक्षिण आफ्रिका 42.3 षटकात 2 बाद 215 (हेंड्रीक्स 81 चेंडूत 7 चौकारांसह 52, झॉर्झी 122 चेंडूत 6 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 119, व्हॅन डेर ड्युसेन 51 चेंडूत 5 चौकारांसह 36, मार्करम नाबाद 2, अवांतर 6, अर्शदीप सिंग 1-28, रिंकू सिंग 1-2).

Advertisement
Tags :

.