दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेला व्हाईटवॉश
दुसऱ्या कसोटीत 109 धावांनी विजय : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप
वृत्तसंस्था/ गकेबराह (दक्षिण आफ्रिका)
येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109 धावांनी धुव्वा उडवला आहे. यासह आफ्रिकेने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकण्याची किमया केली. टेम्बा बवुमाच्या संघाने 348 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात विजयी आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघ 238 धावांत ऑलआऊट झाला. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिकेत मात्र मोठा फेरबदल झाला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. आफ्रिकेच्या विजयाने मात्र टीम इंडियाचे टेन्शन मात्र नक्कीच वाढले आहे.
प्रारंभी, नाणेफेक जिंकत फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 358 धावांपर्यंत मजल मारली. रायन रिकेल्टन आणि काइल वेरेन या दोघांनी शतकी खेळी केली. रिकेल्टनने 11 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. तर वेरेन 105 धावांवर नाबाद परतला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने 78 धावांची निर्णायक खेळी केली. श्रीलंकेने प्रत्युतरात पहिल्या डावात 328 धावा केल्या. श्रीलंकेसाठी पथुम निसांकाने 89 धावांची खेळी केली. कामिंदु मेंडीसने 48 धावा केल्या. इतर फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली, मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. यामुळे द. आफ्रिकेला पहिलया डावात 30 धावांची आघाडी मिळाली. यानंतर आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात बवुमा आणि एडन मॅरक्रम या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. बावुमाने 66 तर मॅरक्रमने 55 धावा केल्या. तर इतरांनीही छोटेखानी खेळी केली. या जोरावर आफ्रिकेने दुसऱ्या डावात 317 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 348 धावांचं आव्हान मिळाले.
लंकन फलंदाजांची हाराकिरी
आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 348 धावांचा पाठलाग करताना लंकेने चौथ्या दिवसअखेरीस 5 गडी गमावत 205 धावा केल्या होत्या. श्रीलंकेला पाचव्या दिवशी विजयासाठी 143 धावांची गरज होती. तर दक्षिण आफ्रिकेला 5 विकेट्सची गरज होती. पण कालच्या 205 धावांच्या धावसंख्येत लंकन संघ केवळ 33 धावाच जोडू शकला आणि 238 धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाशिवाय बाकीचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. सिल्वाने 92 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली. यष्टिरक्षक कुसल मेंडिसने 46 धावा केल्या. शेवटचे 4 फलंदाज मिळून केवळ 15 धावा करू शकले. यामुळे दुसऱ्या कसोटीत लंकेला तब्बल 109 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात केशव महाराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा व डेन पीटरसन यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. दरम्यान, डेन पॅटरसनने सामन्यात 7 विकेट घेतल्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. 2 सामन्यात 327 धावा करणाऱ्या कर्णधार बवुमाला प्लेयर ऑफ द सीरीजचा किताब मिळाला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प.डाव 358 व दुसरा डाव 317
श्रीलंका पहिला डाव 328 व दुसरा डाव 69.1 षटकांत सर्वबाद 238 (निसंका 18, दिनेश चंडिमल 29, मॅथ्यूज 32, कमिंदू मेंडिस 35, धनजंड डी सिल्वा 50, कुशल मेंडिस 46, केशव महाराज 5 बळी).