दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड आमनेसामने
वृत्तसंस्था/ लाहोर
जागतिक दर्जाच्या प्रतिभेने भरलेले, परंतु आयसीसी स्पर्धांमध्ये ‘अंडरअॅचिव्हर’चा शिक्का बसलेले न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आज बुधवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने येतील. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी अनुक्रमे 1998 आणि 2000 मध्ये प्रत्येकी एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. परंतु त्यावेळी या स्पर्धेला आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हटले जात होते आणि आता या स्पर्धेला जे महत्त्व आले आहे ते त्यावेळी नव्हते.
मोठ्या स्पर्धांच्या बाबतीत चिकटलेले ‘चोकर्स’ हे लेबल सोडण्याचा दक्षिण आफ्रिका यावेळी प्रयत्न करेल, तर किवी संघ एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात दोनदा (2015 आणि 2019) आणि टी-20 विश्वचषकात (2021) एकदा उपविजेता राहिल्यानंतर आता जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल. मिशेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने गट ‘अ’मध्ये भारताच्या मागे स्थान मिळवले, तर दक्षिण आफ्रिका गट ‘ब’मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पुढे अव्वल स्थानावर राहिला.
बहुतेक विभागांमध्ये दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, परंतु विविधतेमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गोलंदाजीच्या आघाडीवर थोडा पुढे असल्याचे दिसून येते. दोन्ही संघांच्या फलंदाजीत पुरेशी ताकद आहे आणि त्यांच्याकडे दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फिरकी गोलंदाज सामन्याची दिशा ठरवतील अशी अपेक्षा आहे. येथील खेळपट्ट्या थोड्या संथ असल्या, तरी दुबईतील खेळपट्टीइतका त्यावर चेंडू फिरलेला नाही. दोन्ही संघांचे फिरकी गोलंदाज येथे कसे कामगिरी करतात हे पाहणे रंजक ठरेल.
गटातील शेवटच्या सामन्यात भारताकडून 44 धावांनी पराभव झालेला असला, तरी गेल्या महिन्यात झालेल्या तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेल्या विजयामुळे न्यूझीलंडला आत्मविश्वास मिळेल. न्यूझीलंड रविवारी भारताविऊद्ध खेळण्यासाठी दुबईमध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लाहोरला रवाना झाला. लॅथम हा तीन सामन्यांत 187 धावांसह न्यूझीलंडचा आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज ठरला असला, तरी केन विल्यमसनने भारताविऊद्ध 81 धावांची दमदार खेळी करून फॉर्ममध्ये परतणे हे किवींसाठी चांगले लक्षण आहे.
दक्षिण आफ्रिका देखील जोरदार फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत त्यांच्या सर्वांत प्रभावी संघांपैकी एकाला मैदानात उतरवले आहे. त्यांचा शतक झळकावलेला रायन रिकेल्टन अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि टेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर ड्युसेन आणि एडेन मार्करमसारख्या खेळाडूंनीही फलंदाजीत योगदान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी देखील प्रभावी दिसते. कारण त्यांच्या संघात विआन मुल्डर, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जेनसेन, केशव महाराज आणि तबरेज शम्सी आहेत. कागदावर दक्षिण आफ्रिका एक भक्कम संघ दिसत असला, तरी गेल्या एक वर्षातील त्यांचा एकूण फॉर्म आत्मविश्वास वाढवणारा नाही. कारण दक्षिण आफ्रिकेने गेल्या 13 पैकी आठ एकदिवसीय सामने गमावले आहेत.
संघ : न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जेनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, कॉर्बिन बॉश.
सामन्याची वेळ : दुपारी 2:30 वा..