द.आफ्रिकेने केला ऑस्ट्रेलियाचा हिशोब चुकता
दुसऱ्या वनडेसह मालिका जिंकली : एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारुं 193 धावांत ऑलआऊट : इंग्लिसची खेळी वाया
वृत्तसंस्था/ मॅके, ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेतील विजयासह मालिका खिशात घातली आहे. याआधी मागील आठवड्यात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत आफ्रिकन संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याचा वचपा त्यांनी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत काढला आहे. मॅथ्यू ब्रीत्झके आणि ट्रिस्टन स्टब्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेने 49.1 षटकात 277 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुंचा संघ 193 धावांत ऑलआऊट झाला. अर्ध्या संघाने लुंगी एन्गिडीसमोर (42 धावांत 5 बळी) गुडघे टेकले. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 24 रोजी होईल.
प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार मार्करमला भोपळाही फोडता आला नाही तर सलामीवीर रिकेल्टन 8 धावा काढून बाद झाला. यानंतर, टोनी डी झॉर्झीने 38 धावांची खेळी केली, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅथ्यू ब्रित्झकेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 78 चेंडूंत 88 धावा केल्या, ज्यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकार होते. त्याच वेळी, ट्रिस्टन स्टब्सनेही 87 चेंडूंत 84 धावा करुन आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. या दोघांत चौथ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली. हे दोघे बाद झाल्यानंतर वियान मुल्डरने 26 तर केशव महाराजने 22 धावा केल्या. इतर आफ्रिकन फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्याने त्यांचा डाव 49.1 षटकांत 277 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 3 विकेट्स घेतल्या, तर बेरेट, मार्नस लाबुशेन, नॅथन एलिस यांनी मिळून 2 विकेट्स घेतल्या.
कांगारुंचे 193 धावांत पॅकअप
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांचे सुरुवातीचे तीन फलंदाज अवघ्या 38 धावांत बाद झाले. हेड 6 धावांवर बाद झाला तर कर्णधार मिचेल मार्शला 18 धावा करता आल्या. याशिवाय, लाबुशेन 1 धावा करत माघारी परतला. यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंग्लिसने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ग्रीनने 3 चौकारासह 35 धावा केल्या. तर इंग्लिसने सर्वाधिक धावा करताना 74 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारासह 87 धावांचे योगदान दिले. इतर ऑसी फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 37.4 षटकांत 193 धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेकडून एन्गिडीने शानदार गोलंदाजी करताना 42 धावांत 5 गडी बाद केले. त्याच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याचे पहायला मिळाले. एन्गिडी वगळता नांद्रे बर्गर आणि मुथ्थुस्वामी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 49.1 षटकांत सर्वबाद 277 (टोनी डी झॉर्झी 38, ब्रित्झके 88, ट्रिस्टन स्टब्ज 74, वियान मुल्डर 26, अॅडम झाम्पा 3 बळी, बेरेट, लाबुशेन आणि एलिस प्रत्येकी 2 बळी)
ऑस्ट्रेलिया 37.4 षटकांत सर्वबाद 193 (कॅमेरॉन ग्रीन 35, जोस इंग्लिस 87, मिचेल मार्श 18, एन्गिडी 42 धावांत 5 बळी, बर्गर आणि मुथ्थुस्वामी प्रत्येकी 2 बळी).
आफ्रिकेच्या युवा फलंदाजांची कमाल, मॅथ्यू ब्रित्झकेची सलग चार वनडे अर्धशतके
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज मॅथ्यू ब्रित्झकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत 88 धावांची खेळी करून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग चौथे अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात मॅथ्यू ब्रित्झके हा त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या 4 डावात सलग चार वेळा 50 पेक्षा धावा करणारा आफ्रिकेचा पहिला फलंदाज बनला आहे. या कामगिरीसह त्याने भारताच्या नवज्योत सिंग सिद्धूच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सिद्धूने 1987 मध्ये असा कारनामा केला होता. दरम्यान, ब्रित्झकेने यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडेत पदार्पण पेले. या सामन्यात त्याने शतकी खेळी साकारली. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध एक तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन अशी अर्धशतके झळकावली आहेत.
कांगारुंचा मालिका पराभवाचा असाही विक्रम
ऑस्ट्रेलियाला द.आफ्रिकेविरुद्धच्या मागील पाच वनडे मालिकांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. 11 वर्षांपूर्वी त्यांनी आफ्रिकेविरुद्ध शेवटची वनडे मालिका जिंकली होती. त्यानंतर 2016 (5-0), 2018 (2-1), 2020 (3-0), 2023 (3-2) आणि 2025 (2-0) मध्ये आफ्रिकेने विजय मिळवले आहेत.