दक्षिण आफ्रिका आज इंग्लंडला नमवून उपांत्य फेरीत प्रवेशास सज्ज
वृत्तसंस्था/ कराची
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट ‘ब’मध्ये उपांत्य फेरीसाठीची लढाई तीव्र झालेली असताना अव्वल क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिका आज शनिवारी येथे होणाऱ्या सामन्यात संघर्ष करणाऱ्या इंग्लंडचा सामना करेल. यावेळी आपले वर्चस्व गाजविण्याचा आणि अंतिम चार संघांमधील आपले स्थान निश्चित करण्याचा ते प्रयत्न करतील.
गट ‘अ’मध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन सर्वोत्तम संघांनी सहज बाद फेरीत प्रवेश केला आहे, तर गट ‘ब’मध्ये स्पर्धा तीव्र झालेली आहे. अफगाणिस्तानकडून आठ धावांनी झालेल्या पराभवामुळे इंग्लंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला आहे. दक्षिण आफ्रिकेला (3 गुण, 2.140 नेट रन रेट) इंग्लंडकडून पराभूत होण्याचा प्रसंग जरी आला, तरी ते धावसरासरी चांगली असल्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी अनुकूल निकाल मिळविणे फारसे कठीण नाही. कारण त्यांचा संघ संतुलित वाटत आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्यो रूटवर जास्त अवलंबून असलेल्या इंग्लंडच्या तुलनेत त्यांचे प्रमुख खेळाडू जास्त फॉर्ममध्ये आहेत. आतापर्यंत पूर्ण झालेल्या आपल्या एकमेव लढतीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 107 धावांनी चिरडले. रावळपिंडीमध्ये पावसात सामना वाहून गेल्याने दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियासह गुण विभागून घ्यावे लागले.
दक्षिण आफ्रिकेच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रायन रिकेल्टनने शतक झळकावले, तर कर्णधार टेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्करम यांनी प्रत्येकी अर्धशतक नोंदविले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 315 अशी जबरदस्त मजल मारली. त्यानंतर गोलंदाजांनी अफगाणिस्तानला केवळ 208 धावांवर गुंडाळताना चांगले प्रदर्शन घडविले.
कागदावर दक्षिण आफ्रिका एक मजबूत संघ आहे आणि अलीकडील आयसीसी स्पर्धांमध्ये पराभूत करण्यास कठीण असा तो संघ राहिलेला आहे. गेल्या एका वर्षातील त्यांचा एकूण फॉर्म मात्र आत्मविश्वास वाढवणारा नाही. कारण दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या मागील 12 पैकी आठ एकदिवसीय सामने गमावले आहेत आणि जानेवारी, 2024 पासून फक्त चार जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडचा समावेश असलेल्या पाकिस्तानमधील तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आले होते आणि बावुमाच्या संघाला दुखापतग्रस्त इंग्लंडविऊद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. कारण इंग्लंड स्पर्धेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेपूर्वी भारताकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागून इंग्लंडची खराब कामगिरी तेथून सुरू झाली होती. त्यामुळे ज्यो रूट वगळता बाकीच्या खेळाडूंचा आत्मविश्वास हा कमी झालेला आहे.
अफगाणिस्तानविऊद्ध इंग्लंडच्या दृष्टीने रूटची 120 धावांची खेळी ही एकमेव झळाळती बाजू होती. त्याने आपल्या चांगल्या सुऊवातीचे रूपांतर मोठ्या डावात केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाने स्पर्धेची सुऊवात केलेल्या इंग्लंडच्या नेतृत्वाच्या बाबतीत बदल होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी जोस बटलर आपल्या संघाला एक प्रभावी विजय मिळवून देण्यास उत्सुक असेल.
संघ : इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, रेहान अहमद, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, ज्यो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वूड.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, कोर्बिन बॉश.
सामन्याची वेळ : दुपारी 2:30 वा.