For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द.आफ्रिकेला विजयासाठी 226 धावांची गरज

06:50 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
द आफ्रिकेला विजयासाठी 226 धावांची गरज
Advertisement

तिसऱ्या दिवशी पुन्हा गोलंदाजांचे वर्चस्व, झोर्झीचे शतक, मुथुसॅमीचे सामन्यात 11 बळी

Advertisement

वृत्तसंस्था / लाहोर

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाचा तिसरा दिवस पुन्हा गोलंदाजांनी गाजविताना एकूण 16 बळी मिळविले. उभय संघातील फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. आता द.आफ्रिकेला निर्णायक विजयासाठी 226 धावांची जरुरी असून दुसऱ्या डावात त्यांनी 2 बाद 51 धावा जमविल्या आहेत.

Advertisement

पाकच्या नौमन अलीने 112 धावांत 6 गडी बाद केले तर द.आफ्रिकेच्या मुथुसॅमीने 57 धावांत 5 बळी घेत या सामन्यात आतापर्यंत 11 गडी बाद केले आहेत. पाकने पहिल्या डावात 378 धावा जमविल्यानंतर द.आफ्रिकेने पहिल्या डावात 269 धावांपर्यंत मजल मारल्याने पाकने पहिल्या डावात 109 धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. पण द.आफ्रिकेच्या फिरकी माऱ्यासमोर पाकचा दुसरा डाव केवळ 167 धावांत आटोपल्याने द.आफ्रिकेला निर्णायक विजयासाठी 277 धावांचे आव्हान मिळाले. लाहोरची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने बुधवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पाकच्या फिरकीसमोर द.आफ्रिकेची सत्त्वपरीक्षा होणार आहे.

द.आफ्रिकेने 6 बाद 216 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी केवळ 53 धावांत तंबूत परतले. झोर्झीने चिवट फलंदाजी करत 171 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 104 धावा झळकविल्या तर रिकेल्टनने 137 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 71 धावा जमविल्या. हार्मेरने 2 चौकारांसह नाबाद 19 धावा केल्या. झोर्झी आठव्या गड्याच्या रुपात बाद झाला तर 84 षटकात द.आफ्रिकेचा पहिला डाव 269 धावांवर आटोपला. नौमन अलीने 112 धावांत 6, साजिद खानने 98 धावांत 3 तर सलमान आगाने 21 धावांत 1 बळी मिळविला.

109 धावांनी आघाडी घेतलेल्या पाक संघाला दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करता आली नाही. उपाहारावेळी पाकची स्थिती दुसऱ्या डावात 2 बाद 36 अशी होती. सलामीच्या अब्दुल शफीकने 73 चेंडूत 6 चौकारांसह 41 तर बाबर आझमने 5 चौकारांसह 42 तसेच सौद शकीलने 7 चौकारांसह 38 धावा जमविल्या. चहापानावेळी पाकने दुसऱ्या डावात पाच बाद 150 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रात पाकने 3 गडी गमविताना 114 धावांची भर घातली. चहापानानंतर मुथुसॅमीच्या फिरकीसमोर पाकच्या तळाच्या फलंदाजांनी केवळ मैदानात हजेरी लावली. 46.1 षटकात पाकचा दुसरा डाव 167 धावांवर आटोपला. मुथुसॅमीने 57 धावांत 5, हार्मेरने 51 धावांत 4 तर रबाडाने 1 गडी बाद केला. शेवटच्या सत्रातील एक तास बाकी राहिला होता. पाककडून द.आफ्रिकेला निर्णायक विजयासाठी 277 धावांचे आव्हान मिळाले.

द.आफ्रिकेने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण नौमन अलीने सहाव्या षटकातच कर्णधार मार्करमचा 3 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर नौमन अलीने द,.आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना मुल्डेरला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. रिकेल्टन आणि झोर्झी यांनी पुन्हा पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही संघाला सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. दिवसअखेर 22 षटकात द.आफ्रिकेने 2 बाद 51 धावा जमविल्या. रिकेल्टन 3 चौकारांसह 29 तर झोर्झी 16 धावांवर खेळत आहे. नौमल अलीने 20 धावांत 2 गडी बाद केले असून त्याने या सामन्यात आतापर्यंत 8 गडी बाद केले आहेत.

संक्षिप्त धावफलक : पाक प. डाव सर्वबाद 378, द. आफ्रिका प. डाव 84 षटकात सर्वबाद 269 (रिकेल्टन 71, मार्करम 20, झोर्झी 104, मुथुसॅमी 11, हार्मेर नाबाद 19, नौमन अली 6-112, साजीद खान 3-98, सलमान आगा 1-21), पाक दु. डाव 46.1 षटकात सर्वबाद 167 (अब्दुल्ला शफीक 41, बाबर आझम 42, सौद शकील 38, रिझवान 14, नौमन अली 11, मुथुसॅमी 5-57, हार्मेर 4-51, रबाडा 1-33), द.आफ्रिका दु. डाव 22 षटकात 2 बाद 51 (रिकेल्टन खेळत आहे 29, झोर्जी खेळत आहे 16, मारक्रेम 3, मुल्डेर 0, नौमन आली 2-20).

Advertisement
Tags :

.