For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयासह दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

06:10 AM Aug 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
विजयासह दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी
Advertisement

ऑस्ट्रेलियाचा 53 धावांनी पराभव, ब्रेव्हीस ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था/डार्विन

‘सामनावीर’ देवाल्ड ब्रेव्हीसच्या नाबाद शतकाच्या जोरावर द. आफ्रिकेने मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 53 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने दर्जेदार खेळ करत विजयासह मालिकेत बरोबरी केली. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरेल. ब्रेव्हीसने 56 चेंडूत 8 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 125 धावा झोडपताना स्टब्जसमवेत चौथ्या गड्यासाठी 126 धावांची शतकी भागिदारी केली. द. आफ्रिकेतर्फे टी-20 प्रकारात ब्रेव्हीसची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. 20 षटकात द. आफ्रिकेने 7 बाद 218 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 17.4 षटकात 165 धावांत आटोपला.

Advertisement

कर्णधार मार्करमने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, रिकेल्टनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, प्रेटोरियसने 10 चेंडूत 1 षटकारासह 10 धावा जमविल्या. द. आफ्रिकेचे हे पहिले तीन फलंदाज 57 धावांत बाद झाले. त्यानंतर ब्रेव्हीस आणि स्टब्ज यांनी दमदार फलंदाजी करत चौथ्या गड्यासाठी 63 चेंडूत 126 धावांची वेगवान शतकी भागिदारी नोंदविली. स्टब्जने 22 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावा केल्या. व्हॅन डेर ड्युसेनने 1 चौकारासह 5 तर रबाडाने 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. ब्रेव्हीस शेवटपर्यंत आक्रमक फलंदाजी करत नाबाद राहिला. द. आफ्रिकेच्या डावात 11 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 50 धावा जमविताना 2 गडी गमविले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 36 चेंडूत, शतक 67 चेंडूत तर दीडशतक 84 चेंडूत आणि द्विशतक 112 चेंडूत नोंदविले. ब्रेव्हीसने 25 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक तर 41 चेंडूत 8 षटकार आणि 9 चौकारांसह शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियातर्फे मॅक्सवेल आणि ड्वारशुइस यांनी प्रत्येकी 2 तर हॅजलवूड आणि झम्पा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये टीम डेव्हीडने 24 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारासह 50 तर कर्णधार मार्शने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22, कॅरेने 18 चेंडूत 3 चौकारांसह 26, मॅक्सवेलने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाला 16 अवांतर धावा मिळविल्या. द. आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उत्तुंग फटकेबाजी करताना लवकर झेलबाद झाले. द. आफ्रिकेतर्फे माफाकाने 57 धावांत 3 तर बॉशने 20 धावांत 3, रबाडा, मार्करम, एन्गिडी आणि पीटर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 58 धावा जमविताना 2 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 55 चेंडूत आणि दीडशतक 93 चेंडूत नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाच्या डावात 7 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.

द.आफ्रिकेचे अनेक विक्रम

  • मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध द. आफ्रिकेकडून अनेक नवे विक्रम नोंदविले गेले. या सामन्यात टी-20 प्रकारात जलद शतक, सर्वोच्च धावसंख्या, अधिक षटकार द. आफ्रिकेच्या फलंदाजाने ठोकले.
  • टी-20 प्रकारात द. आफ्रिकेतर्फे शतक झळकविणारा ब्रेव्हीस हा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम आपल्या वयाच्या 22 वर्षे आणि 105 दिवसांत केला आहे. ब्रेव्हीसने यापूर्वी रिचर्ड लेवीचा 24 वर्षे 36 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे.
  • द.आफ्रिकेतर्फे टी-20 प्रकारात ब्रेव्हीसने  सर्वोच्च धावसंख्या (नाबाद 125) नोंदविताना 2015 साली विंडीजविरुद्ध द. आफ्रिकेच्या डु प्लेसीसने नोंदविलेला 119 धावांचा विक्रम मागे टाकला.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 प्रकारात द. आफ्रिकेकडून अनेक नवे विक्रम नोंदविले गेले. ब्रेव्हीसने टी-20 प्रकारात द. आफ्रिकेतर्फे सर्वात जलद शतक, सर्वोच्च धावसंख्या तसेच सर्वाधिक षटकार (8) नोंदविले आहेत.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 प्रकारात द. आफ्रिकेतर्फे शतक झळकविणारा ब्रेव्हीस हा सहावा फलंदाज आहे. या प्रकारात ऑस्ट्रेलियाविरुद्ध यापूर्वी भारताचा ऋतुराज गायकवाड, न्यूझीलंडचा ब्रेन्डॉन मेकॉलम, मार्टिन ग्युप्टील, लंकेचा तिलकरत्ने दिलशान आणि विंडीजचा शाय होप यांच्या यादीत आता ब्रेव्हीसचा समावेश झाला आहे.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 प्रकारात ब्रेव्हीसने सर्वाधिक वैयक्तिक धावा करताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वॅटसनचा 2016 साली भारताविरुद्धच्या सामन्यातील नाबाद 124 धावांचा विक्रम मागे टाकला.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 प्रकारात ब्रेव्हीसने स्टब्ज समवेत चौथ्या गड्यासाठी 126 धावांची भागिदारी केली असून ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी आहे. 2014 साली द. आफ्रिकेच्या डी कॉक आणि रॉसो यांनी चौथ्या गड्यासाठी नोंदविलेल्या 129 धावांच्या भागिदारीचा विक्रम स्टब्ज आणि ब्रेव्हीस यांना मागे टाकता आला नाही.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 प्रकारात द. आफ्रिकेची 7 बाद 218 ही सर्वोच्च धावसंख्या असून यापूर्वी म्हणजेच 2016 साली द. आफ्रिकेने 7 बाद 204 धावा जमविल्या होत्या.

संक्षिप्त धावलफक

द. आफ्रिका 20 षटकात 7 बाद 218 (ब्रेव्हीस नाबाद 125, स्टब्ज 31, मार्करम 18, रिकेल्टन 14, प्रेटोरियस 10, अवांतर 10, मॅक्सवेल व ड्वारशुइस प्रत्येकी 2 बळी, हॅजलवूड, झाम्पा प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 17.4 षटकात सर्वबाद 165 (डेव्हीड 50, मार्श 22, कॅरे 26, मॅक्सवेल 16, ड्वारशुइस 12, अवांतर 16, माफाका आणि बॉश प्रत्येकी 3 बळी, रबाडा, मार्करम, एन्गिडी व पीटर प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.