द. आफ्रिकेला 189 धावांची आघाडी
► वृत्तसंस्था / गिक्वेबेरा
दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान द. आफ्रिकेने लंकेवर 189 धावांची आघाडी मिळविली आहे. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात 45 षटकात 3 बाद 159 धावा जमविल्या. या सामन्यात लंकेच्या मॅथ्युजने कसोटी क्रिकेटमधील आपला 8 हजार धावांचा टप्पा गाठला.
या सामन्यात द. आफ्रिकेचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात आल्यानंतर लंकेने पहिल्या डावात 328 धावा जमविल्या. द. आफ्रिकेने पहिल्या डावात लंकेवर 30 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी 45 षटकाअखेर 3 बाद 159 धावा जमविल्या. झोर्जीने 19, मारक्रेमने 55 तर रिक्लेटोनने 24 धावा केल्या. स्टब्ज आणि बहुमा हे अनुक्रमे 23 आणि 29 धावांवर खेळत होते.
लंकेने 3 बाद 242 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. सलामीच्या निशांकाने 157 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 89, चंडीमलने 97 चेंडूत 5 चौकारांसह 44 तर मॅथ्युजने 90 चेंडूत 6 चौकारांसह 44, कमेंदु मेंडीसने 92 चेंडूत 4 चौकारांसह 48, जयसुर्याने 32 चेंडूत 4 चौकारांसह 24, कर्णधार धनंजय डिसिल्वाने 14 आणि करुणारत्नेने 4 चौकारांसह 20 धावा केल्या. लंकेचा पहिला डाव 328 धावांवर आटोपला. द. आफ्रिकेतर्फे पॅटर्सनने 71 धावांत 5 तर केशव महाराज आणि जेनसेन यांनी प्रत्येकी 2 तसेच रबाडाने 1 गडी बाद केला.
मॅथ्युजच्या 8 हजार धावा
लंकन संघातील अष्टपैलु अॅन्जेलो मॅथ्युजने कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा मॅथ्युज हा लंकेचा तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी लंकेच्या कुमार संगकारा, महिला जयवर्धने यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धावा जमविल्या आहेत. मॅथ्युजने 116 कसोटीत 45.23 धावांच्या सरासरीने 16 शतके आणि 44 अर्धशतकांसह हा पल्ला गाठला आहे. त्यामध्ये नाबाद 200 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. जयवर्धनेने 149 कसोटीत 11814 धावा तर संगकाराने 134 कसोटीत 12400 धावा जमविल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका प. डाव 358, लंका प. डाव 99.2 षटकात सर्वबाद 328 (निशांका 89, कमिंदु मेंडीस 48, चंडीमल 44, मॅथ्युज 44, जयसुर्या 24, अवांतर 27, पॅटर्सन 5-71, केशव महाराज 2-65, जेनसेन 2-100, रबाडा 1-56), द. आफ्रिका दु. डाव 45 षटकात 3 बाद 159 (झोर्जी 19, मारक्रेम 55, रिक्लेटोन 24, स्टब्ज खेळत आहे 23, बहुमा खेळत आहे 29)