द.आफ्रिकेला 11 धावांची आघाडी, एल्गारचे नाबाद शतक
केएल राहुलचे आठवे कसोटी शतक : रबाडाचे 5 तर बर्गरचे 3 बळी
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
रबाडा व नांद्रे बर्गर यांची भेदक गोलंदाजी आणि डीन एल्गारचे नाबाद शतक, पदार्पणवीर डेव्हिड बेडिंगहॅमचे अर्धशतक यांच्या बळावर यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीवर पकड मिळविली आहे. भारताच्या 245 धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेने अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा 5 बाद 256 धावा जमवित भारतावर 11 धावांची आघाडी मिळविली आहे.सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केएल राहुलच्या दर्जेदार शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 245 धावांपर्यंत मजल मारली. भारताला 250 धावांच्या आतमध्ये गुंडाळण्यासाठी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाची भूमिका सर्वात महत्वाची ठरली. यजमान आफ्रिकेने पहिल्या डावाची धमाकेदार सुरुवात करीत दिवसअखेर 5 बाद 256 धावा जमविल्या. एल्गार 140 धावांवर खेळत होता. चहापानानंतर द.आफ्रिकेने आणखी दोन बळी गमविले. बेडिंगहॅम अर्धशतकानंतर बाद झाला. त्याने एल्गारसमवेत चौथ्या गड्यासाठी 131 धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत नेले. बेडिंगहॅमने 87 चेंडूत 56 धावा केल्या. बुमराह व सिराज यांनी अनुकूल हवामानात उत्तम गोलंदाजी केली. पण त्यांना अपेक्षित यश आले नाही तर शार्दुल व पी.कृष्णा यांना प्रभाव पाडता आला नाही. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा एल्गार 140 व मार्को जॅनसेन 3 धावांवर खेळत होते. बुमराह व सिराज यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले तर कृष्णाने एक बळी पिटला.
राहुलचे शतक
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 67.5 षटकांत 245 धावांवर आटोपला. यानंतर बुधवारी भारताने 8 बाद 208 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण अवघ्या 37 धावांची भर घातल्यानंतर टीम इंडियाचा डाव संपुष्टात आला. खेळाच्या पहिल्या सत्रात मोहम्मद सिराजच्या (5 धावा) रुपाने पहिला धक्का बसला, त्याला जेराल्ड कोएत्झीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याचवेळी नांद्रे बर्गरने केएल राहुलला क्लीन बोल्ड करत भारताचा डाव संपवला. आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गरने भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. रबाडाने 59 धावांत 5 विकेट घेतल्या तर बर्गरने 50 धावा 3 फलंदाजांची शिकार केली.
राहुलची क्लासिक खेळी
पहिल्या डावात भारतासाठी केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावांची सर्वोत्तम खेळी केली. राहुलच्या या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश राहिला. राहुलने जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. राहुलने शतक झळकावून टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसह संघाची धावसंख्या 245 धावांपर्यंत नेली. विराट कोहली बाद झाला तेव्हा संघाच्या 107 धावा झालेल्या होत्या. त्यानंतर राहुलने अश्विन, शार्दुल, बुमराह आणि सिराजसारख्या फलंदाजांसोबत खेळून टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. या शतकी खेळीसह त्याने अनोखा विक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, सेंच्युरियनमधील राहुलचे हे सलग दुसरे कसोटी शतक आहे. 2021 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत राहुलने 248 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी खेळली होती. सेंच्युरियनमध्ये कसोटी शतक झळकावणारा राहुल हा तिसरा खेळाडू आहे. येथे सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने कोहली आणि सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सचिन आणि कोहलीने प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.
राहुलची आठ पैकी सात शतके परदेशात
केएल राहुलने आतापर्यंत एकूण 8 कसोटी शतके झळकावली आहेत. यापैकी 7 परदेशात झळकावली आहेत. एकमेव शतक हे त्याने मायदेशात चेन्नई येथे झळकावले आहे. दरम्यान, केएल राहुलचे सेंच्युरियनमधील हे दुसरे कसोटी शतक आहे. असा पराक्रम या मैदानावर अन्य एकाही विदेशी फलंदाजाला करता आलेला नाही. यापूर्वी त्याने डिसेंबर 2021 मध्ये याच मैदानावर शतक झळकावले होते. तीही बॉक्सिंग डे टेस्ट होती. दक्षिण आफ्रिकाचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गार आपली शेवटची कसोटी मालिका खेळत आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पहिल्याच डावात एल्गारने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन अशा गोलंदाजांना उत्तर देत आपले शतक पूर्ण केले. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेने 49 षटकांत 3 बाद 194 धावा केल्या होत्या. एल्गारने 140 चेंडूत कसोटीतील आपले 14 वे शतक पूर्ण केले. तो 115 धावांवर तर बेडिंगहॅम 32 धावांवर खेळत होते. दरम्यान, सलामीवीर मार्करम 5 धावा काढून बाद झाला. टोनी झोर्झीला बुमराहने 28 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, पीटरसनला बुमराहने बाद केले. यानंतर मात्र चहापानापर्यंत एल्गार व बेडिंगहॅम यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही.