घरच्या मैदानावर कांगारुंना आफ्रिकेचा जबर धक्का
पहिल्या वनडेत 98 धावांनी विजय : सामनावीर केशव महाराजचे 5 बळी : मालिकेत 1-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ क्वीन्सलँड
मंगळवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 8 बाद 296 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुंचा डाव 198 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर हा वनडेमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे. केशव महाराजने कमालीचा स्पेल टाकत 5 विकेट्स घेत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 22 रोजी होईल.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेला सलामीवीर एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन यांनी 92 धावांची सलामी दिली. रिकेल्टन 33 धावा करत लवकर बाद झाला. मार्करमने 81 चेंडूत 9 चौकारांसह 82 धावा केल्या. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार तेंबा बवुमाने 74 चेंडूत 5 चौकारांसह 65 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू ब्रित्झकेने 56 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 57 धावा केल्या. या दोघांत तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी झाली. हे दोघे बाद झाल्यानंतर युवा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस मात्र स्वस्तात बाद झाला. तर वियान मुल्डरने नाबाद 31 धावांचे योगदान दिले. यामुळे आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावत 296 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन संघ 198 धावांत ऑलआऊट
आफ्रिकेने दिलेल्या 300 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेडने 27 धावा केल्या तर कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक 10 चौकारासह 88 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर केशव महाराजने मात्र ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याच फलंदाजाला मैदानावर टिकू दिले नाही. केशव महाराजने कमालीचा स्पेल टाकत संघाला विजयाच्या दिशेने नेले. महाराजने 10 षटकांत 1 निर्धाव षटक टाकत 5 विकेट्स घेत 33 धावा दिल्या. कांगारुंचा डाव 40.5 षटकांत 198 धावांत आटोपला.
संक्षिप्त धावफलक
द.आफ्रिका 50 षटकांत 8 बाद 296 (मार्करम 82, रिकेल्टन 33, बवुमा 65, ब्रित्झके 57, मुल्डर नाबाद 31, हेड 57 धावांत 4 बळी, द्वारशुईस 2 बळी)
ऑस्ट्रेलिया 40.5 षटकांत सर्वबाद 198 (मिचेल मार्श 88, हेड 27, द्वारशुईस 33, केशव महाराज 5 बळी, बर्गर आणि एन्गिडी प्रत्येकी 2 बळी).
द. आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठा विजय
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 198 धावांवर सर्वबाद करत 98 धावांनी मोठा विजय मिळवला. आफ्रिकेचा हा वनडेमधील ऑस्ट्रेलियावर सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 1994 मध्ये पर्थच्या मैदानावर आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 82 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर, तब्बल 34 वर्षानंतर आफ्रिकेने हा पराक्रम केला आहे.